● मंगळवारी सकाळी 8 वाजताची घटना
● 5 प्रवाशी असल्याची माहिती
नांदेड वरून नागपूरला जाणारी राज्य मार्ग परिवहन विभागाची बस उमरखेड जवळील दहागाव जवळच्या नाल्यात वाहून गेल्याची खळबळजनक घटना सकाळी 8 वाजता घडली. त्या बस मध्ये 5 प्रवाशी असल्याची माहिती मिळाली असून आता पर्यंत दोघांना वाचविण्यात यश आले आहे.
नांदेड वरून पुसद मार्गे नागपुरला जाणारी हिरकणी बस क्रमांक MH 14 BT 5058 सकाळी 7.45 वाजताच्या दरम्यान उमरखेड ला पोहचली होती. उमरखेड- पुसद मार्गावरील दहागाव येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. पूर पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती आणि त्याच वेळी सदर बस पाणी वाहत असलेल्या पुलावरून जाण्यासाठी निघाली.
तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असल्याने बस टाकू नका असे सांगितले. परंतू बसच्या चालकाने कोणाच्याही सूचना न ऐकता पाण्यात बस टाकली. काही प्रत्यक्षदर्शींनी याचे चित्रीकरण केले. चालकाला पुलावरील पाण्याचा व मार्गाचा अंदाज न आल्याने बस पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली.
बस मध्ये 5 प्रवाशी होते त्यातील 2 प्रवाश्यांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले तर तिसऱ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवले. अद्याप दोन प्रवाशी बेपत्ता असून ग्रामस्थ युद्धपातळीवर त्यांचा शोध घेत आहे.