Home वणी परिसर आता शहरातच 4 नवे पदव्युत्तर ‘अभ्यासक्रम’

आता शहरातच 4 नवे पदव्युत्तर ‘अभ्यासक्रम’

827

लोकमान्य टिळक महाविद्यालयाला मिळाली मान्यता

वणी: शहरात आता अतिशय महत्वपूर्ण असलेले 4 नव्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या भटकावे लागणार नाही. तालुकास्तरावर तब्बल नऊ विषयात पदव्युत्तर अभ्यासाची सुविधा असणारे हे विद्यापीठातील कदाचित एकमेव महाविद्यालय असावे.

शिक्षणाची गंगा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी हा उदात्त हेतू पद्मविभूषण लोकनायक बापूजी अणे यांनी बाळगला होता. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळा द्वारे संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयांत नऊ विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

संगणक शास्त्र आणि वनस्पती शास्त्र या विज्ञान शाखा मध्ये तसेच समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या मानव्यविद्या (कला) शाखांमध्ये पदव्युत्तर अर्थात एम. ए. आणि एम. एस. सी. अभ्यासक्रमाची महाराष्ट्र शासनाच्या वतीने या वर्षी नव्याने मान्यता प्राप्त झाली आहे.

महाविद्यालयात यापूर्वीच इंग्रजी, मराठी, इतिहास, रसायनशास्त्र आणि वाणिज्य या पाच विषयात पदव्युत्तर अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध आहे. तसेच आगामी काळात उर्वरित सर्व विषयांसाठी ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक प्रयत्नशील आहेत.

त्याचप्रमाणे इंग्रजी, संस्कृत, अर्थशास्त्र, वाणिज्य, रसायन शास्त्र या विषयात महाविद्यालयाच्या आचार्य पदवी संशोधन केंद्रांना विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे. या नव्याने सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमासह प्रचलित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले आहे.