Home Breaking News ‘शिवभोजन’…पार्सल सुविधा बंद करण्याचा निर्णय

‘शिवभोजन’…पार्सल सुविधा बंद करण्याचा निर्णय

319

1 ऑक्टोबर पासून थाळीचा दर पूर्वीप्रमाणेच..!

वणी : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने आता येत्या 1 ऑक्टोंबर पासून ग्राहकांना शिवभोजन थाळीस पुन्हा 10 रूपये मोजावे लागणार आहेत. तसेच पार्सल सुविधाही बंद करण्यात येणार आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाच्यावतीने 28 सप्टेंबर रोजी परीपत्रक काढण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गरीब व गरजू लोकांना जेवणाअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागू नये यासाठी 15 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वये शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना प्रथमतः एक महिन्याच्या कालावधीसाठी निःशुल्क उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयास 30 जुलैला शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आली होती.

सदर मुदत 14 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे. राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होत असल्याने शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे 10 रूपये प्रतिथाळी एवढा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबर पासून शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे 10 रूपये प्रतिथाळी एवढा राहणार आहे. शिवभोजन केंद्रांमधून उपलब्ध करून देण्यात आलेली पार्सल सुविधा यापुढे बंद करण्यात येत असल्याचेही परीपत्रकात नमुद केले आहे.