● आलिशान वाहनाने करायचा तस्करी
● 2 लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त
● पाटण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
झरी: आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या झरी जामनी तालुक्यात गुटखा तस्करांनी लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील बहुतांश किराणा दुकानात प्रतिबंधित तंबाखू व गुटखा ‘सप्लाय’ होत असल्याची गोपनीय माहिती पाटण ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली. गुरुवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान पाटण बस स्थानक चौकात सापळा रचला आणि आलिशान वाहनासह एकाला ताब्यात घेत 2 लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
झरी-जामनी तालुका हा राज्यपातळीवर सातत्याने दुर्लक्षित राहिला आहे. शासनस्तरावरुन अनेक उपाययोजना करण्यात येतात मात्र त्या अमलात आणल्या जातात का हा संशोधनाचा विषय आहे. आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने “उपद्व्यापी” घटकांचे विशेष लक्ष याच तालुक्याकडे असते.
शेख अलिम मोहम्मद आरिफ (35) रा मोबिनाबाद कॉलनी, पांढरकवडा असे गुटखा तस्कराचे नाव आहे. तालुक्यातील शिबला, माथार्जुन, झरी व पाटण सोबतच आदीवासी बहुल ग्रामीण भागात प्रतिबंधित तंबाखू व गुटखा खुलेआम विकल्या जातो. गावागावातील दुकानातून आबालवृद्धांना सहज प्राप्त होणारा गुटखा पांढरकवडा येथील एक गुटखा तस्कर उपलब्ध करून देत आहे. ताब्यातील आरोपीचा करविता धनी तपासातून उघड होणार आहे.
मागील अनेक महिन्यापासून त्याचे हे काळे कृत्य सुरू आहे. ताळेबंदीच्या कालखंडात तर त्याने संधीचे सोने केले असून पोलिसांना गुंगारा देण्यात तो पटाईत असल्याचे बोलल्या जाते. पाटण हद्दीतील काही गावात गुटख्याची खेप पोहचणार असल्याची माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळताच पोलीस कर्मचारी अमित पोयाम व सचिन गाडगे यांचेसह पाटण बस स्थानक परिसरात सापळा रचला.
बस स्थानक परिसरात एक संट्रो वाहन क्रमांक MH-34- K- 3292 संशयास्पद रित्या उभे दिसले. वाहम चालकाला विचारणा करीत वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात गुटखा व प्रतिबंधित तंबाखू आढळून आला. याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेत एकूण 2 लाख 17 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी केली. पुढील तपास सचिन गाडगे करीत आहे.