Home वणी परिसर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसान भरपाई द्या

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसान भरपाई द्या

161

माकप व किसान सभेची मागणी

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

यावर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. कापूस, सोयाबीन, तूर व भाजीपाला ह्या पीकाची नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांचा अंत न बघता तातडीने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शासनाने यावर्षी पिकाची परिस्थिती बिकट असताना पिकाची आणेवारी 60 टक्क्यांच्या वर दाखवून शेतकऱ्यांना हादरवून टाकले आहे. त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे धोरण अवलंबिले आहे.

शेतकऱ्यांकडून करण्यात येणारा ई पीक पेरा नोंदविणे रद्द करावे आणि यंत्रणेमार्फत पीक पेरा नोंदवावे, पीक विमा काढूनही पीक विमा मिळत नसल्यामुळे ती देण्याची यंत्रणा ताबडतोब राबवावी, किसान सन्मान निधी योजनेत अनेक शेतकऱ्यांची नावे आली नसल्याने शेतकऱ्यांची नावे नोंदवून त्यांना किसान सन्मान निधी देण्यात यावा, अडकवून ठेवलेले पांदण रस्ते मोकळे करून असलेल्या तक्रारी सोडविण्यात याव्या, कापूस व सोयाबीनची आधारभूत किमतीने विकत घेण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या रेटून धरण्यात आल्या.

याप्रसंगी शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, सुरेश शेंडे, मनोज काळे, सुदर्शन पंधरे, गुलाब परचाके, सचिन डांगे यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

वणी: बातमीदार