Home वणी परिसर ग्रामसभेसाठी एक दिवसाचा ‘ग्रामसेवक’

ग्रामसभेसाठी एक दिवसाचा ‘ग्रामसेवक’

357
Img 20240930 Wa0028
अहेरअल्लीच्या सरपंच्याचा अभिनव प्रयोग 

आदिवासी बहूल तालुक्यातील अहेरअल्ली गावात 2 ऑक्टोबर ला ग्रामसभा, मात्र ग्रामसेवकांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकला होता. आता ग्रामसभा होणार नाही हे निश्चित झाले होते मात्र सरपंच्याने ठरवलं ग्रामसभा घ्यायची आणि त्यांनी गावतीलच सुशिक्षित युवकाला एक दिवसाचा “ग्रामसेवक” करून ग्रामसभा पार पाडण्याचा अभिनव प्रयोग केला आहे.

गावातील ग्रामसभा ही सर्वोच्च मानली जाते. ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा गावकऱ्यांना कळवा या करिता शासनाने ग्रामसभा सुरू केल्या आहे. मात्र ग्रामसेवकांनी गांधी जयंती दिनी होणाऱ्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे राज्यात कुठेही ग्रामसभा होणार नाही असे चित्र निर्माण झाले होते. मात्र ग्रामसभा घ्यायचीच असा निर्धार युवा सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत यांनी केला होता.

त्यांनी ग्रामपंचायतिचे सदस्य उपसरपंच अनिल राऊत, सदस्य सविता मन्ने, अमृता राऊत, मनीषा दुधकोहळे, पुष्पा राऊत, गजानन सिडाम यांच्याशी चर्चा केली व गावातीलच एका युवकाला एक दिवसाचा ग्रामसेवक बनविण्याचा प्रस्ताव ठेवला होता.सदस्यांनी त्याला होकार दिला व सुशिक्षित तरुण आशिष राऊत याला एक दिवसाचा ग्रामसेवक बनविण्याचे ठरले.

नियमांची कुठेही पायमल्ली होऊ नये, याची खबरदारी घेतली. त्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. गावातील मुख्याध्यापकांना एक दिवसासाठी ग्रामसेवक म्हणून नियुक्त करा अशी मागणीही सरपंच राऊत यांनी केली होती मात्र एक दिवसाचा ग्रामसेवक करण्यासाठी हिरवा कंदील मिळताच आशिष राऊत याला ग्रामसेवक करून ग्रामसभेचे कामकाज पार पाडले.

त्यामुळे छोटू राऊत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावाच्या भल्यासाठी एखादे कार्य करायचे ठरवल्यास सर्व अडचणींवर मात करता येऊ शकते, हे राऊत यांनी कृतीतून दाखवले आणि राजकीय पुढाऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या वर्षी गांधी जयंतीला ग्रामसभा घेणारी अहेरअल्ली ही बहुदा राज्यात एकमेव ग्रामपंचायत असावी

गाव चोरीला गेल्यावरही दिला होता लढा… 

अहेरअल्ली नवीन गावठानचे दस्तावेज कार्यालयातून गायब झाले होते. अनेकदा पत्रव्यवहार करूनही ते सापडत नव्हते. त्यानंतर छोटू राऊत यांनी या प्रकाराची तक्रार केली. लालफितशाहीचा कळस म्हणजे त्यांनी केलेली तक्रारही गायब झाली. त्यानंतर त्यांनी गाव चोरीला गेल्याचा आरोप केला. हे वृत्त ‘प्रसार माध्यमात’ आल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यानंतर प्रशासनाने त्यांना नवीन गावठानचे दस्तावेज उपलब्ध करून दिले होते हे विशेष. 

वणी – प्रतिनिधी