Home वणी परिसर कोळसा महागल्याने चुना उत्पादन ‘डबघाईस’

कोळसा महागल्याने चुना उत्पादन ‘डबघाईस’

266

दिवाळी हंगामावर विरजण
मजुरांवर बेरोजगारीचे सावट

दरवर्षी पोळा झाला की चुना उत्पादनाला उभारी येत असते. दिवाळी पर्यंत चुना भट्ट्यांवर रात्रंदिवस सारखे कार्य चालत असते. ह्या काळात चुन्याला खूप मागणी असते. चुना उत्पादनाचे कार्य जोरावर असल्याने येथील मजुरांना सुगीचे दिवस असते. येथील मजूर कमी पडतात म्हणून अन्य राज्यातील मजूर मोठ्या प्रमाणावर इथे कामावर असतात.

यावर्षी मात्र कोळशाचे भाव दुप्पट झाल्यामुळे चुना काय भावाने विकावे हा प्रश्न चुना उत्पादकाला पडला आहे. परिणामी अनेक चुना भट्ट्या बंद झाल्या असून मजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगांवर कुऱ्हाड कोसळली होती. यात चुना उद्योग सुद्धा बळी पडला. सध्याच्या काळात लॉकडाऊन हटविल्यानंतर चुना उद्योगाला आता नुकतीच सुरुवात झाली आणि ऐन हंगामात कोळशाचे भाव वाढले आणि चुना उद्योग पुन्हा एकदा बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.

आधीच चुना उद्योगावर वेगवेगळ्या चुन्याला पर्यायी उत्पादन बाजारात आल्याने मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच येथील चुना उद्योगावर अन्य राज्यात असलेल्या चुना उद्योगाकडूनही चुन्याचा दर व गुणवत्तेवरून परिणाम होत आहे. अशी बिकट परिस्थिती असताना कोळशाचे दर वाढल्याने आता काय करावे हा प्रश्न आ वासून चुना उद्योग मालकांसमोर आहे.

आजच्या घडीला 60 ते 70 चुनाभट्ट्या पैकी 10 ते 12 चुना भट्ट्या फक्त सुरू आहेत. ज्या मालकांकडे चुना दळून सनला पावडर बनविणाऱ्या मशीन आहेत, ते चुना उद्योग सध्या चालू अवस्थेत दिसत आहे किंवा ज्यांचे मोठ्या लोखंड उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी शी टेंडर झाले आहे त्यांचाच उद्योग सुरू असल्याचे पहायला मिळताहेत.

ह्या सर्व प्रकारामुळे मात्र येथील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली असून अनेक मजुरांना मोठ्या हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. मजुरांकडे काम नसल्याने फार अल्प दरात काम करावे लागत आहे. दिवसभर काम करूनही 100 ते 150 रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. ह्या सर्व परिस्थिती मुळे चुना उद्योगाला उतरती कळा लागली की काय असे भासायला लागले आहे. या वर्षी चुन्याचा दिवाळीतीळ हंगाम मात्र धूसर झाला आहे.
राजूर कॉलरी : बातमीदार