● शाम सोनटक्के वणीत कायम
गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस दलात सातत्याने बदली सत्र सुरू आहे. मंगळवार दि.12 ऑक्टोबर ला पुन्हा एकदा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून नियुक्त्या केल्या असून तात्पुरता प्रभारावर असलेले वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के यांना कायम करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील रुजू होताच जिल्ह्यातील ठाणेदारांना अवैद्य व्यवसाय खपवून घेतल्या जाणार नसल्याची तंबी वारंवार देण्यात आली होती. तरी देखील जिल्ह्यात काही ठिकाणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अनेकांना नियंत्रण कक्षात बसावे लागले आहे.
जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशन हे हेविवेट पोलीस स्टेशन म्हणून ओळखल्या जाते. येथे वर्णी लागावी या करिता अनेक अधिकारी प्रयत्नशील असतात. तत्कालीन ठाणेदार वैभव जाधव यांची प्रशासकीय कारणावरून नागपूर येथे बदली करण्यात आली होती. त्यांच्या रिक्त जागेवर तात्पुरता प्रभार देवून शाम सोनटक्के यांचेकडे कारभार सोपविण्यात आला होता.
ठाणेदार शाम सोनटक्के यांचेकडे जिल्हा वाहतूक शाखा व वणी पोलीस स्टेशन अशा दोन महत्वपूर्ण विभागाच्या जबाबदाऱ्या असल्याने जिल्हा वाहतूक शाखेतून मुक्त करत वणीची धुरा सोपविण्यात आली आहे. तर मारेगाव येथील जगदीश मंडलवार यांची पांढरकवडा, रामकृष्ण महल्ले यांना पांढरकवडा वरून जिल्हा वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. सपोनि राजेश पुरी यांना मारेगाव तर नियंत्रण कक्षात असलेल्या पोलीस उप निरीक्षक स्नेहा शेडगे यांची अवधूत वाडी येथे प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार