● सुपारी, गुटखा, तंबाखू…सब गोलमाल है
सुपारीच्या माध्यमातून शासनाला “चुना” लावण्याचे कारस्थान व्यवसायिक येनकेन प्रकारे करतात. प्रतिबंधित बाबीचा शहरात व ग्रामीण भागात पुरवठा होतोच कसा हा संशोधनाचा विषय आहे. सुपारी, गुटखा, तंबाखू….सब गोलमाल असल्याचे दिसत असून दररोज 10 लाख रुपयांच्या वर वणीकर सुपारी चघळत असल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे.
वणीकर नागरिकांना “पटेल” की नाही, हा भाग वेगळा मात्र सत्य नाकारता येत नाही. शहरात ठीक ठिकाणी पान टपऱ्याचे जाळे पसरले आहेत. “खर्रा” हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय झाला आहे आणि याकरिता लागणारी सुपारी नागपूर, हैद्राबाद आदी ठिकाणावरून व्यावसायिक आयात करतात.
वणी शहर व ग्रामीण भागात दीड हजाराच्या वर पान टपऱ्या आहेत. त्या केवळ खर्रा या प्रसिद्ध उत्पादनासाठी चालविण्यात येतात. अन्य वस्तू फक्त सजावट किंवा तात्पुरता खर्च भागविण्यासाठी असतो. उत्पादनाचा खरा स्रोत “खर्राच” आणि सरासरी प्रति पानटपरी दीड ते दोन किलो सुपारीचा वापर करतात.
सध्यस्थीतीत सुपारीचा दर प्रचंड वधारला आहे. प्रति किलो साडे पाचशे ते सहाशे रुपये झालेला आहे. म्हणजेच शहर व ग्रामीण भागात तब्बल 10 लाख रुपयांच्यावर दररोज सुपारी विकल्या जाते आणि पुरवठा करतात येथील व्यावसायिक.
शहरात दररोज येणाऱ्या सुपारी बाबत विक्रीकर विभाग अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित होत असून व्यावसायिक GST बिलाचा वापर करतात का ?की कच्च्या बिलाचा..! हे तपासणे गरजेचे आहे. दररोज 10 लाखाची सुपारी, शासनाला चुना लावून आणल्या जात असेल तर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.