Home सामाजिक त्या….अभागी बालिकांचे भविष्य “अंधःकारमय”..!

त्या….अभागी बालिकांचे भविष्य “अंधःकारमय”..!

412

अवघ्या काही वर्षात हरवले पारिवारिक छत्र
अंध धनश्रीचा सांभाळ कशी करेल दीपिका
मदतीचे हात सरसावेल का ?

दोन्ही डोळ्यांनी अंध ‘धनश्री’ अवघ्या 9 वर्षाची तर 13 वर्षीय मोठी बहीण दीपिका.आता तिलाच अंध बहिणीचा सांभाळ करावा लागणार. काही वर्षातच आजोबा, वडील, आजी यांनी जगाचा निरोप घेतला तर दसऱ्याच्या दिवशी आई चे झालेले निधन मनाला चटका लावून जाणारे. मातृ पितृ छत्र हरवलेल्या त्या….अभागी बालिकांचे भविष्य “अंधःकारमय” झाले.

सुखी संसाराला दृष्ट लागावं आणि काल्पनिक कथेत घडणाऱ्या घटना ‘त्या’ कुटुंबात घडाव्यात यापेक्षा दुर्दैव ते कोणतं. कुटुंब प्रमुख आजोबा गेलेत… आणि 8 वर्षांपूर्वी वडिलांची अचानक exit …काही कालावधी नंतर आजीने जगाचा निरोप घेतला. संपूर्ण परिवार हादरला आणि आई ने परिवाराची धुरा सांभाळली. नियतीला हे मान्य नव्हतं, अंध धनश्री व दीपिकाला पोरकं करून ती माऊली सुद्धा पाच दिवसांपूर्वी गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा साठी निवडलेलं आर्णी तालुक्यातील दाभाडी हे गाव रातोरात प्रकाश झोतात आलं होतं त्याच गावातील ‘त्या’ अभागी भगिनी. पवार कुटुंब सुख समाधानाने नांदत असतांना घरातील एकएक स्तंभ निखळत गेला. आता राहिल्या त्या दोन चिमुकल्या भगिनी.

हक्काची माणसं गेल्यामुळे निराधार झालेल्या त्या दोन्ही चिमुकल्यांच्या भावी आयुष्यात रंग भरण्यासाठी आता खरी गरज आहे सामाजिक बांधिलकीची. मदतीचा हात पुढे करण्याची…त्यांच्या निरागस आयुष्याला सांभाळण्याची. सरसावतील का सामाजिक संस्था, समाज भूषण आणि दातृत्ववान.

छत्र हरविलेल्या धनश्री व दिपिका बाबत कळताच माजी आमदार श्रीकांत उर्फ बाळासाहेब मुनगीनवार हे तडक दाभाडी गावात पोहचले. त्या दोन्ही भगिनींचे सांत्वन केले आणि जीवनावश्यक वस्तू देत भविष्यात त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी यथायोग्य सहकार्य करावे असे आवाहन सुध्दा मुनगीनवार यांनी केले आहे.
वणी: बातमीदार