रामचरित्राच्या श्रवणाने दोष क्षालन होऊन दैवी गुणांची स्थापना होते. ही महर्षी वाल्मिकींनी यांची समस्त मानव जातीला दिलेली अद्वितीय देणगी आहे.” असे विचार संस्कृत भारती च्या विदर्भ प्रांत शिक्षण विभाग प्रमुख प्रणीता प्रशांत भाकरे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महर्षी वाल्मिकी हे केवळ संस्कृत साहित्याचे पहिले कवी आहेत किंवा त्यांनी रचलेले रामायण हे विश्वातील आद्य मानव रचित काव्य आहे, एवढेच त्यांचे महत्त्व नाही तर रामायणाचा रूपात भारतीय संस्कृतीचा अलौकिक मानदंड महर्षी वाल्मिकींनी आपल्यासमोर स्थापित केला आहे. महाकाव्याची लक्षणेच पुढे जाऊन भरतमुनींनी रामायणाच्या आधारावर वर्णन केली हे रामायणाचे महत्त्व आहे.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग, आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि संस्कृत भारतीच्या वणी शाखेच्या संयुक्त विद्यमाने आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने आयोजित आभासी व्याख्यानमालेत त्या आपले मत व्यक्त करीत होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख आणि संस्कृत भारती वणी चे अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी आभासी माध्यमातून विविध मान्यवरांच्या ज्ञानाचा लाभ घेण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. हे अधोरेखित करीत प्रत्येक महिन्यात अशा व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार ही योजना स्पष्ट केली.
आपल्या उद्बोधनात प्रणीता भाकरे यांनी शिवपुराण इत्यादी ग्रंथात आलेला महर्षी वाल्मिकी चा पूर्व इतिहास सांगून, त्यांची आणि देवर्षी नारदांची भेट, त्यांना झालेला पश्चाताप, तपश्चर्येने आलेली तप:पूतता, जीवनाच्या सत्यतेची झालेली जाणीव इत्यादी पैलू स्पष्ट करून रामनामाचे, संतवचनांचे महत्त्व सांगत क्रौंचवधाच्या प्रसंगाचा उल्लेख करीत पुढे रामायणाच्या निमित्ताने भगवान ब्रह्मदेवांनी सांगितलेल्या इतिहासाच्या आधारे मानवी स्वरूपातील रामाचे वर्णन करताना भावनांचे कसे संतुलित स्वरूप साकार केले आहे हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तथा तांत्रिक बाजू आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि संस्कृत भारती चे वणी नगर मंत्री महेश पुंड यांनी सांभाळली.
वणी: बातमीदार