● वाहने सोडून आरोपी पळाले
● 3 लाखाचा मुद्देमाल जप्त
खरबडा परिसरातून मालवाहू वाहनात निर्दयपणे कोंबलेल्या गोवंशाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. रविवार दि.24 ऑक्टोबरला सकाळी जत्रा मैदान प्रेमनगर जवळ सापळा रचुन नाकाबंदी केली असता गोवंशाची अवैद्य वाहतूक करणारे पसार झाले असून 2 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोवंश तस्करी व वाहतूक यावर आळा घालण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्नरत आहेत. गोवंशाची तस्करी व वाहतूक करणारे पोलिसांच्या रडारवर असताना तस्कर मात्र संधीच्या शोधात असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
डीबी पथक प्रमुख सपोनि माया चाटसे यांना गोपनीय सूत्रांकडून रविवारी सकाळी माहिती प्राप्त होताच त्यांनी पथकासह जत्रा मैदान परिसरात सापळा रचला. यावेळी मालवाहू वाहन क्रमांक MH-29-OT- 0285 ला थांबविण्यासाठी पोलीस सरसावले असतानाच वाहनातील दोघांनी वाहन बाजूला लावून पोबारा केला.
मालवाहू वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात निर्दयीपने 7 गोवंश जनावरे कोंबून होती. तसेच या वाहनाची रेकी करणारी दुचाकी क्रमांक MH-29- BL- 6314 ला अडविण्याचा प्रयत्न करताच दोघांनी दुचाकी सोडून पळ काढला. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र ते पसार झाले.
पोलिसांनी यावेळी दोन्ही वाहने ताब्यात घेत 42 हजार रुपये किमतीचे गोवंश, मालवाहू वाहन किंमत 1 लाख 80 हजार व दुचाकी 75 हजार असा एकूण 2 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मालक, चालक, व अन्य अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील -भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के यांचे आदेशावरून डी.बी पथकाचे प्रमुख स.पो.नि.माया चाटसे, सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरीन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास स.पो.नि. माया चाटसे हे करीत आहे.
वणी: बातमीदार