● शिरपूर पोलिसांची कारवाई
अवैद्य व्यवसायावर आळा घालण्यासाठी शिरपूर पोलीस सज्ज झाले आहेत. समाज विघातक कृती करणाऱ्या प्रवृत्तीवर पोलिसांची तीक्ष्ण नजर आहे. शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील मोहदा येथे अवैध जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने धाड टाकून 5 जुगाऱ्याना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवार दि. 7 नोव्हेंबर ला कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात शिरपूर पोलीस ठाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या ठाण्यात वर्णी लागावी या करिता सपोनि दर्जाच्या अधिकाऱ्यात चांगलीच चढाओढ असते. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी वणी उप विभागात नियोजनबद्ध पद्धतीने योग्य अधिकाऱ्यांना प्रभार देत जुनी साखळी खंडित केली आहे.
शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील मोहदा हे गाव गौण खनिज उत्खननाकरिता ओळखल्या जाते. अवैध उत्खनन आणि होणारी वाहतूक प्रशासनाकरिता डोकेदुखी ठरत असली तरी मानव निर्मित प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सातत्याने वाढत आहे. त्यातच अवैद्य व्यवसायाने चांगलाच कहर केला आहे.
मोहदा परिसरात अनेक अवैध धंद्यांनी बस्तान बसवले आहे. घटनेच्या दिवशी शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मोहदा येथे धाड टाकली असता 5 जुगाऱ्याना ताब्यात घेण्यात आले आहे.
भारत बळीराम कोडापे (28), मंगलदास दौलत टेकाम (34), रूषी बालाजी डुमने (30), पद्दाकर रामचंद्र देठे (45) विठ्ठल नंदु आडे (50) सर्व रा मोहदा असे जुगार खेळत असलेल्यांची नावे आहेत. त्यांचे कडून 4 हजार 620 रुपये रोकड जप्त करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि गजानन करेवाड, पीएसआय रामेश्वर कांडूरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
वणी: बातमीदार