● गडचिरोली पोलिसांना मोठे यश
● तेलतुंबडे हे अनेक वर्षांपासून नक्षल चळवळीत
महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील जंगलात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 26 माओवाद्यांचा खात्मा शनिवार दि. 13 नोव्हेंबर ला करण्यात आला. या चकमकीत वणी तालुक्यातील राजूर (इजारा) या गावातील मूळ रहिवाशी असलेला नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.
मिलींद तेलतुंबडे हे वणी पासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर (इजारा) येथील रहिवासी होते. त्यांचे घरगुती नाव अनिल तर शैक्षणिक दस्तऐवजातील नांव मिलिंद असे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून महाविद्यालयीन शिक्षण वणीतील महाविद्यालयात घेतले.
मिलिंद तेलतुंबडे हे अभियंता होते त्यांनी वेकोलीत काहीकाळ नोकरी केली आहे. ते पदामापूर, दुर्गापूर येथे कर्तव्यावर असताना आयटक युनियन मध्ये सामील झाले. त्यांनी जनरल सेक्रेटरी वणी उत्तरची जबाबदारी पार पाडली मात्र या दरम्यान ते नक्षल चळवळीत सक्रिय झाले.
तेलतुंबडे यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेत पूर्णवेळ नक्षल चळवळीत सक्रिय राहत असल्याचे घरच्या मंडळींना सांगितले. त्यानंतर ते 1996 पासून आजपर्यंत वणीत परतले नाहीत. त्यांची पत्नी ह्या प्राध्यापक असून चंद्रपूर येथे वास्तव्यास आहे.
मिलिंद तेलतुंबडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. तो गेल्या काही वर्षांपासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय आहे. त्याने भाकप माओवादी पक्षाचा महाराष्ट्र सचिव म्हणूनही काम केलं आहे. नक्षली नेत्यांमधल्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी तो एक होता. दलित सेंट्रल कमिटीचा पहिला दलित सदस्य होता.
अनेक नक्षली चळवळीत त्याचा सहभाग असल्याने महाराष्ट्र पोलीस सबोतच छत्तीसगड, आंध्रप्रदेश पोलिसांना मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा शिरावर महाराष्ट्र पोलिसांनी 50 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. तेलतुंबडे हा सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास अश्या वेगवेगळ्या नावाने वावरत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर झालेल्या चकमकीत तो ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते. पोलिसांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. या चकमकीत पोलीस जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला. दिवसभर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये जवानांनी मोठ्या हिंमतीने लढा देत 26 माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
वणी: बातमीदार