Home Breaking News तालुक्यात 2 वाघांचा मुक्तसंचार, वन विभागाचा दुजोरा

तालुक्यात 2 वाघांचा मुक्तसंचार, वन विभागाचा दुजोरा

702

पशुपालक त्रस्त, शेतकरी, शेतमजूर भयभीत
रासा शिवारात गायीचा पाडला फडशा

वणी तालुक्यात गेल्या अनेक महिन्यापासून वाघाचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. पाळीव प्राण्यावर होणारे हल्ले आणि शेत शिवारातील वाघाचा मुक्तसंचार यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत तर शेतकरी, शेतमजूर कमालीचे भयभीत झालेत. तालुक्या 2 वाघांचा वावर असल्याचा दुजोरा वन विभागाने दिला आहे.

गुरुवारी रासा शिवारात पुन्हा वाघाने गायीचा फडशा पाडला. राजू बलकी यांची जनावरे रासा शिवारातील जंगल परिसरात चाराईला गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने गायीची शिकार केली.

तालुक्यातील रासा, सुकनेगाव व मारेगाव (कोरंबी) शिवारात गेल्या काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. 19 नोव्हेंबर ला बकरीवर वाघाने हल्ला चढवून फडशा पडला होता. तसेच दोन महिन्या पूर्वी याच परिसरात वाघाने बैलावर हल्ला चढवून जखमी केले होते.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तालुक्यात 2 वाघांचा वावर आहे यातील एक वाघ वेकोली परिसरात तर दुसरा रासा शिवारात वावरत आहे. हे दोन्ही वाघ ताडोबा अभयारण्यातील असावेत असा कयास वर्तविण्यात येत आहे.

ताडोबा अभयारण्य व टिपेश्वर अभयारण्य या भागातील मुकूटबन परिसरा हा मध्यबिंदू आहे. नर-मादी वाघांचा संचार 25 किलोमीटर क्षेत्रात असतो. या परिघात दुसऱ्या वाघाची एन्ट्री क्वचितच होत असल्याचे तज्ञ सांगतात.

वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात कॅमेरे लावण्यात आले आहे. वाघाचा जनावरांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी व शेतमजूर भयभीत झाला आहे. तर पशुपालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. शेतशिवारात वावरणाऱ्या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
वणी: बातमीदार