● राज्य सरकार अलर्ट, निर्बंध लागू
कोरोनाची दुसरी लाट ओसरताच नागरिक बिनधास्त झाले होते. कोविड त्रिसूत्रीचे पालन पूर्णतः विसरले आणि दबा धरून बसलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. नोव्हेंबरमध्ये वणीत 4 पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांना सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी शहरात विठ्ठलवाडी परिसरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर दि. 27 नोव्हेंबर ला यवतमाळला तपासणी केलेले दोघे पॉझिटिव्ह निघालेत. यावरून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोरोनाचा विळखा सम्पूष्टात आल्याचे ग्राह्य धरून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करणे सोडून दिले होते. सणासुदीच्या दिवसात बाजारात तुफान गर्दी आढळून आली. व्यावसायिकांनी देखील कोविड नियमांचे पालन तंतोतंत केले नाही.
मागील काही दिवसांपासून राज्यात वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झालं आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक वाहतुकीत लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे. रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे.
कोविड त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुकानात जातांना मास्क ची सक्ती करण्यात आली असून मास्क न घातल्यास दुकानदाराला 10 हजार रुपये दंड तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला 50 हजार दंड, राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार