Home राजकीय आघाडी सरकारने शेतकऱ्यांना फसविले

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना फसविले

591
Img 20240930 Wa0028

आमदार बोदकुरवार यांचा आरोप
30 नोव्हेंबरला धरणे आंदोलन

शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आघाडी सरकार मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला. भाजपाच्या वतीने राज्य शासनाला जाग यावी यासाठी 30 नोव्हेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र परिषदेतून स्पष्ट करण्यात आले आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाची बोन्ड सडली, कापूस पडला, सोयाबीन चिखलात एकरूप झाली. अशा प्रकारे अतोनात नुकसान झाले. वणी तालुक्यातील 9 मंडळांपैकी शिंदोला, पुनवट या मंडळात अतिवृष्टी होऊनही या मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांची अशी दयनीय स्थिती असतांनाच शासनाच्या विद्युत विभागाने थकीत कृषी पंप वीज धारक शेतकऱ्यांची विद्युत जोडणी खंडित करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक घेण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे.

शासनाची चाललेली दडपशाही अन्यायकारक आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्याना लोकशाही मार्गाने आक्रोश आंदोलन करण्यात येणार होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूका आणि लागलेली आचारसंहिता बघता दि. 30 नोव्हेंबरला उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

आ. बोदकुरवार यांनी विश्राम गृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत आपली व्यूहरचना स्पष्ट केली. याप्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, भाजपचे जेष्ठ नेते तथा इंदिरा सूत गिरणीचे संचालक दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, नितीन वासेकर, विजय गारघाटे, शंकर बांदुरकर, संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार