● गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचा होणार हिरमोड
वणी तालुक्यातील जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे वाढणार असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चार ऐवजी पाच गट असतील. यामुळे तयारीत असणाऱ्या व गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे.
ऐनवेळी राज्य शासनाने घेतलेला निर्णय अनेकांच्या स्वप्नांवर विरजण पडणारा आहे. लोकसंख्येच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने सर्वच राजकीय पक्षाला नव्याने तयारी करावी लागणार आहे.
वणी तालुक्यात शिंदोला- शिरपूर, लाठी- लालगुडा, राजूर – चिखलगाव व घोन्सा – कायर असे 4 जिल्हा परिषद गट होते. या चार गटात एक शिवसेना तर अन्य तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते.
शासन निर्णयामुळे जर पाच गट निर्माण झाले तर ते संभाव्य कायर-शिरपूर, घोंसा- वाघदरा, चिखलगाव- राजूर, लाठी- लालगुडा व तरोडा- शिंदोला असे असतील असे राजकिय विश्लेषकांचे मत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात एकमेव राजकीय पक्ष सध्यस्थितीत निर्जिवावस्थेत आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना पक्षाचे स्वयंघोषित नेते केवळ आमदारकीचेच स्वप्न रंगविण्यात दंग असल्याचे दिसत आहेत.
संभाव्य गटातील शिंदोला, कायर व शिरपूर या भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे तर घोंसा, लाठी, वाघदरा या परिसरात भाजपाने आपले वलय निर्माण केले आहे. त्याप्रमाणेच राजूर, लालगुडा व चिखलगाव येथे प्रमुख राजकीय पक्षाचे प्राबल्य आहे.
तालुक्यातील 4 गट व 8 गणांचा विचार करता भाजपा, शिवसेना, काँग्रेस, मनसे, माकप व वंचित बहुजन आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांनी आपली निवडणूक रणनिती आखली होती त्याला आता तडा जाणार आहे. भविष्यातील बदलाचा विचार करता आता नव्याने उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे.
वणी: बातमीदार