● 7 नंबर शाळेत कार्यक्रम संपन्न
येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्र.7 मध्ये महापरिनिर्वाण दिन, निरोप समारंभ व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती रंजू झाडे, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे व सत्कार मूर्ती म्हणून वसंत गोरे उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकराविषयी श्रेयस देवाळकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सिंधु गोवरदीपे, मंगला पेंदोर यांनी डॉ. आंबेडकर व या शाळेचे माजी मुख्याध्यापक वसंत गोरे यांच्या कार्याविषयी गुणगौरव पर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
याप्रसंगी अतिथीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे अनुकरण करण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. त्यानंतर वसंत गोरे यांचा पुष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना वसंत गोरे यांनी या शाळेतील शिक्षकांच्या कार्यक्षमतेचा व सहकार्याच्या भूमिकेचा उल्लेख करून या शाळेतून निरोपादाखल केलेल्या सरकारबद्दल आभार व्यक्त केले.
त्यानंतर विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेपैकी निबंध स्पर्धेतील नितीन बर्वे, पूनम निखाडे, तन्मय निंबाळकर यांना चित्रकला स्पर्धेतील पुष्पक कांबळे, वैष्णवी बघेल, संस्कार घाटे, कनिष्क खामनकर यांना व सामान्य ज्ञान स्पर्धेतील हंसिका डहाके, अनघा दोडके, पुष्पक कांबळे, अदिती मेश्राम या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक चंदू परेकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी व आभार प्रदर्शन मंगला पेंदोर यांनी केले.
वणी: बातमीदार