Home वणी परिसर भव्य दिव्य….शिंदोला येथे व्यसनमुक्तीचा जागर

भव्य दिव्य….शिंदोला येथे व्यसनमुक्तीचा जागर

436

भव्य यात्रा महोत्सव, कोरोना योध्याचा सत्कार
मोफत कोविड चाचणी व लसीकरण

वणी: नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवसाला पावणारा म्हणून पंचक्रोशीत प्रख्यात शिंदोला येथील शिवेचा मारोती देवस्थानात भव्य यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. संजय निखाडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित महोत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असते.

यावर्षी यात्रा महोत्सवातील उच्चांकी गर्दी आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. भागवताचार्य रामेश्वर महाराज खोडे यांच्या अमोघ वाणीतील श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ व व्यसनमुक्ती सप्ताहातून पंचक्रोशीत व्यसनमुक्ती संकल्पाचे वाहणारे वारे नव्या वर्षात उमेद घेऊन आले आहेत.

शिंदोला, परमडोह, कळमना, येनक, कुर्ली, पाथरी, चनाखा शिवारातील या मंदिर परिसरात दरवर्षी 1 जानेवारीला हि यात्रा भरते. शिवेचा मारोती देवस्थान कमिटी, गुरुदेव सेवा मंडळ, माऊली परिवार, संजय निखाडे मित्र परिवार आणि परिसरातील असंख्य भाविकभक्तांच्या सक्रिय परिश्रमातून या जत्रा महोत्सवाला सामाजिक उत्तरदायीत्वाची परंपरा लाभत आहे.

एक लक्ष पिशव्यांचे रक्त संकलन संकल्प पूर्ततेसाठी जत्रेत भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी देवस्थान कमेटी व संजय निखाडे मित्र परिवार करीत असते. यावर्षी 130 दात्यानीं रक्तदान करून 3000 रक्तपिशव्या संकलनाचा टप्पा पूर्ण केला आहे. संकलित रक्तपिशव्या शासकीय रक्तपेढीला सुपूर्द करून गरजू आणि गरीब रुग्णांना पुरवल्या जातात.

समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेला वेसन घालण्यासाठी व्यसनमुक्ती सप्ताहातून प्रबोधन आणि समुपदेशन केल्या जाते. यावर्षी येथे शेकडो लोकांनी व्यसनमुक्ती ची शपथ घेतली आहे.

करोनाप्रलय काळात जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांचा शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच जत्रेत यंदा मोफत लसीकरण आणि कोविड चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने भाविकभक्तांची गैरसोय दूर झाली.

यात्रा महोत्सवात तीन दिवसीय खंजेरी भजन स्पर्धेत विदर्भातील नावाजलेल्या भजन मंडळांनी सहभाग नोंदवून मंदिर परिसरात चैतन्य निर्माण केले हे विषेश.
वणी: बातमीदार