Home Breaking News वणीकरांनो सावधान… नियमभंग केल्यास ‘दंड’

वणीकरांनो सावधान… नियमभंग केल्यास ‘दंड’

1222
Img 20240930 Wa0028

दहा पथकासह पालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज

वणी: कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक मात्र बेभान वागताहेत. कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे विसरलेत. आता पालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाली असून शहरात ठिकठिकाणी पथके तैनात केली आहे. नियमभंग करणारे ग्राहक, विक्रेते आणि नागरिक निशाण्यावर असून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाची पहिली व दुसरी लाट भयानक आघात करणारी ठरली. आर्थिक, मानसिक व शारीरिक पीडा देणाऱ्या संसर्गाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला होता. अर्थव्यवस्था डबघाईस आली. त्यातून सावरत असताना पुन्हा तिसऱ्या लाटेच्या आगमनाची चाहूल लागली. नवं वर्षाच्या सुरुवातीलाच बाधितांची संख्या वाढायला लागली आहे.

राज्यात सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेत राज्य शासनाने कोविड त्रिसूत्री बाबत निर्बंध लागू केले आहेत. मात्र नागरिक ऐकण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. सामाजिक अंतर, मास्कचा वापर करत नाहीत. बाजारातील गर्दी आणि कोविड त्रिसूत्रीचा अवलंब होत नसल्याने पालिका प्रशासन आक्रमक पवित्र्यात सरसावली आहे.

सार्वजनिक ठिकाणी चहेऱ्यावर माक्स न लावल्यास पहिल्यांदा 500 रुपये, दुसऱ्यांदा 750 रुपये व तिसऱ्यांदा आढळल्यास 1000 रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे.

दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रते आणि ग्राहक यांनी आपापसात सामाजिक अंतर ठेवणे अभिप्रेत आहे. तसे न आढळल्यास प्रथमतः 200 रुपये प्रति ग्राहक व आस्थापनाला 2000 ररुपये दंड, दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा नियमभंग केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

किराणा, जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना वस्तूचे दरपत्रक लावावे लागणार आहे तसे न केल्यास प्रथमतः 2000 ररुपये, दुसऱ्यांदा 5000 रुपये व तिसऱ्यांदा 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

पालिका प्रशासनाने पालिका शाळेतील शिक्षकांची दहा पथके तयार केली असून प्रत्येक पथकाला शहरातील ठिकाणे नेमून दिलेली आहे. नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पथके सज्ज झाली असून प्रत्येक प्रतिष्ठान, पदपथावरील व्यावसायिक व नागरिकांना नियमाचे पालन करण्याच्या सूचना देताहेत. तर नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
वणी: बातमीदार