Home Breaking News आता..ठाणेदारांना सादर करावे लागेल अवैद्यधंदे बंद चे ‘प्रमाणपत्र’

आता..ठाणेदारांना सादर करावे लागेल अवैद्यधंदे बंद चे ‘प्रमाणपत्र’

785
Img 20240613 Wa0015

अवैद्यधंद्याच्या समूळ उच्चाटनासाठी SP चे आदेश

वणी : डीआयजी च्या पथकाने वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य धंद्यावर ‘रेड’ करून आपली पुढील कार्यप्रणाली स्पष्ट केली होती. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सावध पवित्रा घेत अवैद्यधंद्याच्या समूळ उच्चाटनासाठी पाऊल उचलले आहे. यामुळे आता ठाणेदारांना ‘अवैद्य धंदे बंद असल्याचे प्रमाणपत्र’ सादर करावे लागणार असून SDPO यांना ‘टेस्ट चेक प्रमाणपत्र’ दरमहा पाठवावे लागेल.

जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैद्य धंद्यावर पोलीस उप महानिरीक्षकांची वक्रदृष्टी पडली आणि वणीत धाडसत्र अवलंबत नऊ लाखाच्यावर मुद्देमाल जप्त केला. कारवाई होणार हे अपेक्षित असताना गाफील राहिल्याने स्थानिक पोलीस प्रशासनावर नामुष्की ओढावली आणि आजपर्यंत केलेल्या कारवायांवर पाणी फेरल्या गेले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची प्रतिबध्दता व कटिबध्दता निश्चित करण्यासाठी नवीन कार्यपध्दती सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पोलीस स्टेशन व उपविभाग कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारचे अवैध धंदे समूळ नष्ट व नेस्तनाबूत करुन, अवैध धंदयांचे समूळत: उच्चाटन करुन सर्व अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्यासाठी सक्त आदेशित करण्यात आले आहे.

ठाणेदार यांनी त्यांचे पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत, याची सर्वतोपरी दक्षता व खबरदारी घ्यावी लागणार आहे. अवैध धंदयाविरुध्द व्यापक प्रमाणात व सातत्यपूर्ण छापे घालून सर्व प्रकारचे अवैध धंदे समूळ नष्ट व नेस्तनाबूत करुन, अवैध धंदयांचे समूळत उच्चाटन करून कायमस्वरूपी बंद करण्याची कार्यवाही करावी करावी लागेल. तसेच अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध प्रभावी व परिणामकारक कायदेशीर व प्रतिबंधक कारवाई करावी असे आदेशीत केले आहे.

पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये कोठेही अवैध जुगाराचे अड्डे, अवैध गावठी दारुचे अड्डे, अवैध गुटखा तस्करी, अवैध रेती-वाळू तस्करी, अवैध जनावर तस्करी, अवैध गांजा तस्करी, अवैध चोरटी प्रवासी वाहतूक आदी प्रकारचे अवैध धंदे चालु नाहीत. कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरुपी बंद आहेत असे ‘अवैद्य धंदे बंद असल्याचे प्रमाणपत्र’ ठाणेदारांना सादर करावे लागणार असून SDPO यांना ‘टेस्ट चेक प्रमाणपत्र’ दरमहा पाठवावे लागणार आहे.
वणी: बातमीदार