Home वणी परिसर अवैध व्यवसाय पोलीस प्रशासन कठोरतेने हाताळणार – डॉ. दिलीप भुजबळ पाटील

अवैध व्यवसाय पोलीस प्रशासन कठोरतेने हाताळणार – डॉ. दिलीप भुजबळ पाटील

909
जाणीवपूर्वक विरोधाभासी वातावरण निर्माण करणे टाळा

वणी:- अवैध व्यवसायाबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाचे धोरण स्पष्ट आहे. जिल्ह्यात यावर कठोरतेने कार्यवाही चालू आहे. मागील महिन्यात अमरावती पोलीस महासंचालकांच्या पथकाने वणी येथे टाकलेल्या धाडीमुळे आम्ही आत्मपरिक्षण करून जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय अधिक कठोरतेने हाताळू, पण जाणीवपूर्वक विरोधाभासी वातावरण निर्माण करणे टाळले पाहिजे. असे रोखठोक प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. ते वणी येथे दि. 17 फेब्रुवारीला सायंकाळी वसंत जिनिंगच्या सभागृहात आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या सभेत प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे उपस्थित होते. त्यासोबत व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, तहसीलदार निखिल धुळधर, पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून वणीचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून आगामी सण व उत्सवात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

पुढे बोलतांना डॉ.भुजबळ म्हणाले की, जातीय सलोखा वृद्धींगत व्हावा, विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी या शांतता समितीच्या सभेचे संपूर्ण जिल्ह्यात आयोजन करणे सुरू आहे. या जिल्ह्याला आंतरराज्यीय गुन्हेगारीच आव्हान आहे. चंद्रपूर- वणी भाग हा गौण खनिजामुळे समृद्ध आहे. यातून असामाजिक तत्वांच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. जिल्ह्यातील पोलीस दल गुणात्मक तपास करून गुन्हा उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्यात यशस्वी होत आहे. दक्ष व सुजाण नागरिकांनी यात महत्वाची भूमिका घेऊन प्रत्येकांनी खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही त्यांनी केले. त्यासोबत वणीला आवश्यक तो पोलीस बळ पुरवून पोलिसासाठीच्या सदनिकेच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

याप्रसंगी आगामी सण, उत्सवाच्या संदर्भात व या परिसरातील समस्यांबाबत वंचित बहुजनचे मंगल तेलंग, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, मारेगाव येथील संजय लव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना आ. बोदकुरवार म्हणाले की, वणी विधानसभा क्षेत्र हा शांततेचा पुरस्कर्ता आहे. विविधतेत एकता हे देशाचे वैशिष्ट या परिसरात पाहायला मिळते. आगामी शिवजयंती उत्सव आवश्यक ती काळजी घेऊन प्रशासनाने साजरी करण्यास परवानगी देऊन छत्रपती शिवाजींची शिकवण सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी अनेक संस्था व संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केलं. आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांनी केले.
वणी : बातमीदार