Home Breaking News दणका…..चक्क…अकरा ग्रामपंचायत सदस्य ‘अपात्र’

दणका…..चक्क…अकरा ग्रामपंचायत सदस्य ‘अपात्र’

2445
Img 20241016 Wa0023

निवडणूक खर्च सादर न करणारे 124 उमेदवार

वणी: राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचने नुसार निवडणूक लढविणा-या व्यक्तींनी विहित मुदतीत निवडणूक खर्चाचे विवरण सादर करणे गरजेचे असते. मात्र कालावधी लोटून तसेच बाजू मांडण्याची संधी देऊन सुद्धा हिशोब सादर न करणाऱ्या तालुक्यातील 124 उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला. तर तब्बल अकरा ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्यात आल्याने ग्रामीण भागात चांगलीच खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ब मधील तरतुदी नुसार निवडणूक लढविणा-या व्यक्तींनी निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या रितीने खर्चाचा हिशोब द्यावा लागतो.

वणीत 47 गावातील निवडणूक लढविणाऱ्या 124 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. तसेच यात निवडून आलेल्या 11 सदस्यांचा समावेश असल्याने त्या सर्वांना पाच वर्षा करीता अपात्र ठरविण्यात आले आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य संगीता संतोष निमकर- चनाखा, वैशाली एकनाथ रायसिडाम- नांदेपेरा, शंकर किसन चांदेकर- कळमना (खु), विद्या विलास कालेकर- विरकुंड, लीना दिवाकर भोंगळे- बेलोरा, विद्या अशोक राखुन्डे, शामकला लहू गावंडे व आशिष मनोहर भोंगळे- वडजापूर, पल्लवी मयूर कोसारकर- पाठारपूर( पिल्की वाढोना), राजेश मुरलीधर सिडाम व ममता भास्कर पुयाम- उमरी अशा अकरा विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

या प्रकरणात सन 2021 मध्ये सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 चे कलम 14-ब, मधील तरतुदीनुसार अनर्ह का ठरविण्यात येऊ नये याबाबत खुलासा मागविण्यात आला होता. नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन करून आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 चे कलम 14 (ब) .मधील अधिकाराचा वापर करून सन 2021 मध्ये निवडणूक ‘लढविलेल्या उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांकरीता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह (अपात्र) ठरविण्यात आल्याने ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघाले आहे.
वणी: बातमीदार