Home Breaking News युक्रेन मध्ये अडकलेला ‘अभिनयन’ ‘सुखरूप’…उद्या मायदेशी परतणार.!

युक्रेन मध्ये अडकलेला ‘अभिनयन’ ‘सुखरूप’…उद्या मायदेशी परतणार.!

508

भारत सरकारचे रेस्क्यू ऑपरेशन

वणी: येथील गुरू नगर मध्ये वास्तव्यास असलेला 21 वर्षीय ‘अभिनयन’ हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेन ला अवघ्या एक महिन्यांपूर्वी गेला होता. तेथील युद्धजन्य स्थिती बघता विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नरत असून युक्रेन मध्ये अडकलेला ‘अभिनयन’ ‘सुखरूप असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

वणीतील अभिनयन राम काळे हा विद्यार्थी Bukovinion state Medical University Higher educational Institution chernivtsi, Ukraine येथे MBBS प्रथम वर्षात शिकतोय. तो युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 1 मार्चला मायदेशी परतणार होता.

रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू झाले आहे. मिसाईल आणि तोफ गोळ्यांचा वर्षाव केला जातोय. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा तेथील स्थानिक पातळीवर भयावह स्थिती आहे. वैद्यकीय शिक्षणाकरिता गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करताहेत.

रशिया आणि युक्रेन मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ‘अभिनयन’ च्या परिवाराने 1 मार्च चे तिकीट बुक केले होते ते रद्द करण्यात आल्याने पारिवारिक मंडळी चिंताग्रस्त झाली होती. शासनाने केलेल्या आवाहनानंतर त्याची इत्यंभूत माहिती कळविण्यात आली आणि होत असलेल्या प्रयत्नाने पारिवारिक मंडळी सुखावली.

भारत सरकारने हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी तेथे अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान AI-1943 शनिवारी रात्री 8 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विद्यार्थ्यांना उतरवले आहे. यात ‘अभिनयन’ चा समावेश नसून तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना उद्या आणण्यात येणार असल्याचे ‘अभिनयन’ चे काका काशिनाथ काळे यांनी सांगितले.

अभिनयन काळे हा विद्यार्थी युक्रेनच्या ज्या प्रांतात राहतो तेथून रोमानिया पर्यंत त्याला वाहनाने जावे लागणार आहे. याकरिता 7 ते 8 तासाचा कालावधी लागतो तर 1 तास पायदळ चालल्यानंतर तो विमानतळावर पोहचणार असल्याचे काशिनाथ काळे यांनी सांगितले. अभिनयन राहत असलेल्या वसतिगृहातील अन्य प्रांतातील विध्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आले असून महाराष्ट्रातील 50 ते 60 विद्यार्थ्यांना उद्या मायदेशी आणण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार