● शनिवारी रात्री वणीत पोहचला
वणी: MBBS च्या प्रथम वर्षात शिकत असलेला वणीतील सुपुत्र अभिनयन काळे हा अवघ्या एक महिन्यापूर्वीच युक्रेन ला गेला होता. त्याने चेरणीविस्टी येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभ्यासक्रमाला नुकतीच सुरुवात झाली आणि रशिया-युक्रेन मध्ये युद्धाचे ढग दाटायला लागले. तोफगोळ्याचा वर्षाव, सर्वत्र हाहाकार, भेदरलेला परिवार आणि मायदेशाची ओढ. अखेर शनिवारी रात्री तो वणीत पोहचला.
अभिनयन राम काळे हा विद्यार्थी आपल्या परिवारासह वणीतील गुरू नगर परिसरात वास्तव्यास आहे. तो वैद्यकीय शिक्षणा करिता एक महिन्यांपूर्वी युक्रेन ला रवाना झाला होता. तो Bukovinion state Medical University Higher educational Institution chernivtsi, Ukraine येथे MBBS प्रथम वर्षात शिकतोय.
रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला, सर्वप्रथम युक्रेनची राजधानी ‘कीव’ ला टार्गेट करण्यात आले. क्षणाक्षणाला डागण्यात येणारे मिसाईल. हवेत घिरट्या मारणारे हेलिकॉप्टर, सतत वाजणारे सायरन, धडकी भरवणारे शेकडो रणगाडे, हवेतून मारा करणारे विमाने यामुळे युद्धाची दाहकता कमालीची वाढली होती.
युक्रेन मध्ये तब्बल 18 हजार भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने त्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे आव्हान होते. युध्दजन्य स्थितीत युक्रेन मधून विद्यार्थ्यांना लगतच्या देशातून आणण्याची रणनीती आखत केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा राबवले. एअर इंडिया व हवाईदलाच्या विमानाने रोमानिया, पोलंड, आदी देशातून विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करण्यात आले.
अभिनयन राम काळे हा विद्यार्थी चेरणीविस्टी येथे शिकत होता. येथे युद्धाची धग जाणवत नव्हती, कारण कीव पासून हे ठिकाण बरेच दूर असून रोमानिया बॉर्डर जवळ आहे. त्याचे वसतिगृहात 600 भारतीय विद्यार्थी होते. भारतीय दूतावासाने जारी केलेल्या ऍडव्हायझरी नुसार तीन टप्पे पाडण्यात आले आणि त्यानुसारच विद्यार्थ्यांना रोमानिया बॉर्डर वरून मायेदशी रवाना करण्यात आले.
अभिनयन मायदेशी परतल्याने घरच्या मंडळींनी सुटकेचा श्वास घेतला. तेथील संपूर्ण वातावरण निवळल्या नंतरच पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे तो शिकत असलेल्या विद्यापीठाने स्पष्ट केले. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम होणार असल्याचे अभिनयन याने सांगितले.
वणी: बातमीदार