● संशयास्पद मृत्यूने माजली खळबळ
वणी : नागपूर येथील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोराडी परिसरातील रेल्वे रुळालगत कोळशाच्या ढिगाऱ्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्याच्या खिशात मिळालेल्या विड्रॉल स्लिपच्या पावती वरून ओळख पाठविण्यात आली असून तो मृतदेह ‘संतोष’ चाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संतोष गोमकर (45) असे मृतकाचे नाव असून शहरातील जुने कॉटन मार्केट परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. तो सध्यस्थीतीत रेल्वे सायडिंग वर कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. दि. 8 मार्चला तो नेहमी प्रमाणे कर्तव्यावर गेला मात्र तेव्हा पासून तो घरी परतला नाही.
बुधवारी कोरडी परिसरातील रेल्वे रुळालगत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. लकडगंज पोलिसांनी प्राथमिक तपास आरंभलेला असताना मृतकाच्या खिशात दहा हजार रुपयांची ATM मधून निघालेली स्लिप आढळली त्यावर असलेल्या नावावरून तो युवक वणीतील असल्याची खात्री पोलिसांना झाली.
लकडगंज पोलिसांनी अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्याचे छायाचित्र व माहिती वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतकाचा भाऊ प्रशांत गोमकर सोबत संपर्क साधत मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी नागपूरला रवाना झाले होते.
त्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली असून तो ‘संतोष’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु तो नागपूरला का व कशासाठी गेला, त्याचा मृत्यू कशाने झाला, असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस तपासाअंती मृत्यूचे खरे कारण उघड होणार आहे. मात्र एका धडपड्या युवकाच्या आकस्मिक मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वणी: बातमीदार