Home Breaking News “माझ्या पतीची हत्याच”…न्यायाच्या प्रतीक्षेत ‘कुटुंब’

“माझ्या पतीची हत्याच”…न्यायाच्या प्रतीक्षेत ‘कुटुंब’

1001
Img 20240930 Wa0028

कंपनीचा बेजबाबदारपणा
पोलिसांचा तपास संथगतीने…!

वणी: कोळशाच्या काळ्याकुट्ट अंधारात रात्री ‘ड्युटीवर’ गेलेल्या पतीचा दोनशे किलोमीटर अंतरावर कोळशाच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळतो. स्थानिक पोलीस प्रशासन गुन्हा दाखल न करताच तपास करत असल्याचा कांगावा करतात आणि ‘ते’ बेजबाबदार कंपनी काहीच झालं नाही या अविर्भावात वावरतात. संतोषचा संशयास्पद मृत्यू… घातपात की अपघात याचे गूढ वाढत असताना “पतीची हत्याच…” झाल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

वणी परिसरात कोळशाची काळी कहाणी सर्वपरिचित आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिपथास न येणाऱ्या या व्यवहारात करोडोची उलाढाल रात्रीतून होते. कोल इंडियाच्या अधिनस्थ यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांचे न दिसणारे हितसबंध ‘ब्लॅक डायमंड सिटी’ ला आर्थिक समृद्धी प्रदान करत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

महा मिनेरल माईनिंग प्रा.लि. ही कंपनी पॉवर प्लांट ला वॉश केलेला कोळसा पुरवठा करतो. याकरिता त्यांची अधिकृत खाजगी रेल्वे सायडिंग आहे. दिवस-रात्र कोळशाची रेल्वे द्वारा रॅक देशभरात पोहचविण्यात येते. याच कंपनीत ‘संतोष’ मागील एक वर्षापूर्वी पिंपळगाव प्लाँट च्या कोल सायडिंग, हॅन्डलिंग सुपरवायझर या पदावर रुजू झाला होता.

नेहमीप्रमाणे ‘तो’ रात्रपाळी साठी आठ मार्चला रात्री 9:30 वाजता घरून आपल्या दुचाकीने गेला. पत्नी सुवर्णा ने त्याला रात्री 10 वाजता फोन केला त्यावेळी तो ड्युटीवर होता. परंतु तो दुसऱ्या दिवशी घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर सायंकाळी रेल्वे सायडिंग वर विचारणा केली असता तो रात्री 12: 30 वाजता रेल्वे रुळाने गेल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले आणि शंकेची पाल चुकचुकली.

दोन दिवसांपासून बेपत्ता ‘संतोष’ ची शोधाशोध सुरू असताना 10 मार्च ला रात्री वणी पोलीस तडक घरी आले. तब्बल 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराडी पोलीस स्टेशन हद्दीत कोळशाची व्हॅगन खाली केल्यावर ढिगाऱ्यात एक अनोळखी मृतदेह आढळल्याचे सांगितले.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पत्नी सुवर्णा आपल्या नातेवाईकांसह नागपूरला पोहचली आणि एकच हंबरडा फोडला. त्याचा मृत्यू नैसर्गीक नव्हता, पोटावरील भाग जळालेला अवस्थेत होता तर जिभ बाहेर निघालेली होती आणि मृतदेहाच्या कानातुन रक्त बाहेर निघालेले होते. असा स्पष्ट आरोप पत्नी सुवर्णाने तक्रारीतून केला आहे. तर पतीची हत्याच झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘संतोष’ च्या मृत्यूला जबाबदार कोण ? असे नानाविध प्रश्न उपस्थित होत असून त्या कोळसा कंपनीचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज निर्माण झाली असून कोळसा चोरी प्रकरणाचा संबंध तर नाही ना ! हा तपासाचा भाग आहे. कोराडीत व्हॅगन मध्ये कोळशाच्या ढिगाऱ्यात आढळणारा मृतदेह कंपनीची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. पोलिसांनी तत्परतेने तपास केल्यास घातपात, अपघात की हत्या याचा छडा लागणार हे निश्चित….अन्यथा…!
वणी: बातमीदार