● आ. बोदकुरवार यांनी उपस्थित केला प्रश्न
● दोषी आढळल्यास संचालकांवर होणार कारवाई
वणी: बँक संचालक तथा कंत्राटदार व शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने रुपये 18 लाख रुपयांची बनावट FDR तयार करून बँकेची व जिल्हा परिषद बांधकाम विभागाची फसवणूक केली. याप्रकरणी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विधिमंडळात लक्षवेधी दाखल केली होती. यावर उत्तर देतांना सहकार मंत्री म्हणाले की, चौकशी अहवालात संचालक दोषी आढळल्यास कारवाई होईल.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण येथे बँक संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार व शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने रुपये 18 लाख 10 हजार रुपयांची बनावट संकल्प मुदत ठेवी योजनेच्या पावत्या दि. 16 फेब्रुवारी 2022 रोजी बनवून बँकेची व जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. 1 यवतमाळ यांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत आ. बोदकुरवार यांनी विधिमंडळात लक्षवेधी दाखल केली.
लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्री यांनी शाखा व्यवस्थापकावर कारवाई केल्याचे सांगितले तसेच विशेष लेखा परीक्षा वर्गाकडून चौकशी सुरू असल्यामुळे सहकार आयुक्तांकडून चौकशी करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बनावट FDR तयार करणाऱ्या संचालकावर FIR दाखल करून अपात्र करणार का ? या प्रश्नाला उत्तर देतांना सहकार मंत्री म्हणाले की, कंत्राटदारच सदस्य असल्याचा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट करत चौकशी अहवालात सदस्य दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार संचालक मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ यांनी व शाखा व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण यांनी शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येते. या गंभीर प्रकरणाची शासनाने तात्काळ दखल घेवून FIR दाखल करावे अशी मागणी सुद्धा आ. बोदकुरवार यांनी विधिमंडळात केली होती त्यावर काय होणार हे कालांतराने स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार