● कुंभा येथील घटना, लाखो रुपयांचे नुकसान
कुंभा: मारेगाव तालुक्यातील कुंभा शेत शिवारात गुरुवार दि. 31 मार्चला शेतातील गोठ्याला दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात लाखो रुपयांच्या शेतीपयोगी साहित्यासह उमदा बैल दगावल्यांची घटना घडली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शासनस्तरावरुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
विजय महादेव उरकुडे हे कुंभा येथील शेतकरी आहेत. कुंभा शिवारात त्यांचे शेत असून शेतातील गोठ्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण गोठा कवेत घेतला. तेथे बांधून असलेल्या बैल जोडीतील एक बैल आग लागताच पळून गेला मात्र दुसरा बैल आगीत होरपळून दगावला.
शेतातील प्रत्यक्षदर्शींनी आग विझविण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत तेथे ठेवलेले स्पिनकलर पाईप, लाकडी बाज, मशागतीची साधने, जनावराचे खाद्य आदी शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे तब्बल एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कुंभा: बातमीदार