Home Breaking News राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य उघड, शहरात झळकले जिल्हाध्यक्ष हटावचे बॅनर..!

राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य उघड, शहरात झळकले जिल्हाध्यक्ष हटावचे बॅनर..!

990

पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

हरीश कामारकर: जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. काही कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव, अशा प्रकारचे पोस्टर शहरातील विविध भागात लावण्यात आले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य उघड होत आहे.

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरदचंद्र पवार यांचा 10 एप्रिलला अमरावती येथे दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या निमित्ताने अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात यवतमाळमध्ये एका बैठकीचे आयोजन रविवार दि. 3 एप्रिलला दुपारी तीन वाजता करण्यात आले होते. त्यापूर्वी जिल्ह्यातील पक्षाअंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

शहरात सदर पोस्टर कोणी लावले, जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर हे जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाला नको आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. बंगल्याच्या निकटस्थ असलेल्या विद्यमान जिल्हाध्यक्षाना जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावर ही पक्ष्याकडून आरूढ करण्यात आले होते.

या उमेदीच्या काळात पक्ष संघटन किंवा पक्षीय उपक्रम राबविण्यात आले नसल्याने जिल्हाध्यक्षांवर कार्यकर्त्यां मधून नाराजीचा सूर उमटू लागला होता. या सर्व बाबींची खदखद आज पोस्टरबाजीतुन पाहायला मिळत असून जिल्हाध्यक्ष हटाव अशी मागणी पक्षातुन होत आहे. आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…!

दहा एप्रिलला शरद पवारांचा विभागीय दौरा
पश्चिम महाराष्ट्राला आपला बालेकिल्ला म्हणून वर्षानुवर्षे अबाधित ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला मात्र विदर्भात आपले पाय मजबूत करता आले नाही. विदर्भातील बोटावर मोजण्या इतक्या जागा सोडल्यातर विदर्भात राष्ट्रवादीचा प्रभाव नाही आणि ज्या ठिकाणी पक्षाचे अस्तित्व आहे तेथे गटबाजीचे ग्रहण लागलेले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्टींनी आता संघटनात्मक बांधणीचा मोर्चा विदर्भाकडे वळविला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 10 एप्रिलला राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार अमरावती विभागाच्या दौऱ्यावर असून ते पक्ष संघटन व आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करतील अशी माहिती राष्ट्रवादी कडून देण्यात येत आहे.
यवतमाळ: बातमीदार