● पिंपळगाव परिसरात दहशत
● वाघ्रदर्शनाने कामगार भयभीत
वणी: पिंपळगाव कोळसा खदानीतील काटा घराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट काटेरी झुडपालगत तीन वाघ निवांत बसलेले होते. कामगारांना वाघ्रदर्शन होताच दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची घटना बुधवार दि. 6 एप्रिल ला दुपारी दोन वाजता घडली.
मागील अनेक महिन्या पासून तालुक्यात वाघाचा वावर आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरे वाघाने फस्त केली आहे. तालुक्याला लागूनच असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातुन वाघ तालुक्यात येत असल्याचे बोलण्यात येते.
काही महिन्यांपासून कायर, नेरड, रासा, घोन्सा, सुकनेगाव, उकणी व निलजई या वेकोलीच्या क्षेत्रात वाघाचा वावर दिसून येत होता आता पिंपळगाव कोळसा खदान परिसरात चक्क तीन वाघ दिसल्याने दहशत निर्माण झाली आहे.
बुधवारी दुपारी काही कामगारांना वाघाचे दर्शन झाले. त्यांनी त्याच वेळी छायाचित्रण केले तसेच पलीकडून कोणताही दुचाकीस्वार येऊ नये याची खबरदारी घेत होते. याच वेळेस त्यातील दोन वाघ काटेरी झुडपात निघून गेले. तीन वाघांचा परिसरातील वावर भयभीत करणारा असून वेकोलीचे कामगार रात्री बेरात्री त्या परिसरातून आवागमन करतात. याप्रकरणी वन विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.
वणी: बातमीदार
.