● उत्सवादरम्यान शोभायात्रेत घडले हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन
वणी : वणीत श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शोभायात्रा दरम्यान शहरात मुस्लिम संघटनेकडून श्रीराम पालखीचे स्वागत करुन शोभायात्रा समिती अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा सत्कार करण्यात आल्याने येथे हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन पहायला मिळाले.
रामनवमीनिमित्त रविवार दिनांक १० एप्रिल रोजी वणी शहरात रामनामाच्या भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींचे विधिवत पूजन करून या शोभायात्रेला सायंकाळी 6 वाजता प्रारंभ झाला.
महिला, पुरुष, बालगोपालांसह आबालवृद्धांच्या या सर्वसमावेशक शोभायात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण पालखी, घोडे,रथ, भजन, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी यासह विशेष आकर्षण म्हणजे नेत्रदीपक रांगोळी होती. पुणे येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार भुषण खंडारे हे शोभायात्रा मार्गावरील प्रत्येक चौकात नेत्रदीपक अशी रांगोळी काढत होते.
शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकट पोहोचताच मुस्लिम संघटनेकडून श्रीराम पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भावीक भक्तांना हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन पहायला मिळाले.
वणी: बातमीदार