Home Breaking News भीषण अपघातात 2 महिला ठार, 5 जखमी

भीषण अपघातात 2 महिला ठार, 5 जखमी

1069

देवदर्शन घेऊन परतताना घडली घटना

वणी: नागमंदिर भद्रावती येथून देवदर्शन घेऊन वणी तालुक्यातील गावी परतताना वरोरा जवळील नंदोरी फाट्यालगत वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व भीषण अपघात झाला. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 5 व्यक्ती जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. 12 एप्रिल ला रात्री नऊ वाजता घडली.

चंद्रभागा सुधाकर गौरकार व मनीषा रोगे रा. वरझडी (बंडा) असे अपघातातील मृतकाची नावे आहेत. तर भाग्यश्री मनोज रोगे (26), सावी मनोज रोगे (4), सविता रमेश हरडे (45) सर्व राहणार वरझडी व वणी येथील अनिरुद्ध महादेव तपासे व महादेव रामराव तपासे हे पिता-पुत्र देखील जखमी झाले आहेत.

तालुक्यातील वरझडी (बंडा) येथील भाविकांचा भद्रावती येथिल नाग मंदीरात स्वयंपाक होता. याकरिता मंगळवारी मंदिरात पोहचले. जेवणावळी आटोपल्यावर देवदर्शन घेऊन ते डिझायर वाहनाने वणी कडे जाण्यास निघाले. रात्री 9 वाजताच्या दरम्यान नंदोरी फाट्या जवळ भरधाव ट्रकने कट मारला यामुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले.

अपघात होताच नागरिकांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलवले आणि पोलिसांना सूचना देण्यात आल्या. देवदर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
वणी: बातमीदार