● मंगरूळ येथील घटना, मोठया प्रमाणात नुकसान
वणी: यवतमाळ जिल्ह्यातील डेक्कन शुगर (Deccan sugar ) कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. साखरेसोबतच दारू उत्पादन करणारा जिल्ह्यातील ख्यातनाम कारखाना आहे. या घटनेत एक ते दीड करोड रुपयाचे नुकसान झाले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ येथे डेक्कन शुगर (Deccan sugar) नामक साखर कारखाना आहे. येथे डेक्कन देशी दारूचे उत्पादन करण्यात येते. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या करखान्यातच आग लागत असेल तर संशयाची पाल शेतकऱ्यांच्या मनात चुकचुकली आहे.
साखर कारखान्याला आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले होते. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान कारखान्यातील बॉयलर मधील टर्बाईन इलेक्ट्रिक सप्लाय होत असलेल्या पॅनल बोर्ड ला आगीने कवेत घेतले आणि क्षणात रौद्र रूप धारण केले.
साखर कारखान्यात लागलेली आग शॉर्टसर्किट ने लागली असावी असे बोलल्या जात आहे. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र तोपर्यंत एक ते दीड करोड रुपयाचे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
डेक्कन शुगर (Deccan sugar) कारखान्यात साखरेच्या उत्पादनासोबतच दारूची निर्मिती करण्यात येते. हीच आग दारू उत्पादन होत असलेल्या विभागात लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु कारखाना स्थापित होऊन अनेक वर्षे झाली आहेत. दरवर्षी फायर ऑडिट करण्यात येते का हे तपासणे गरजेचे असून ऑडिट केलेले नसल्यास कठोर कारवाई अपेक्षित आहे.
वणी: बातमीदार