● उपचाराची उचलली जबाबदारी
● पीडित परिवाराला अर्थसहाय्य
वणी: समाजमन सुन्न करणारी घटना मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे घडली होती. एका सहा वर्षीय चिमुकलींवर निर्दयी अत्याचार करून काटेरी फासात फेकण्यात आले होते. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पीडित परिवाराची भेट घेवून चिमुकलीच्या उपचाराची जबाबदारी घेत तातडीने 10 हजाराची आर्थिक मदत केली.
पहापळ येथे दि. 9 मे ला 32 वर्षीय नराधमाने एका सहा वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिला काटेरी फासात फेकले होते. बेशुद्धावस्थेत ती चिमुरडी रात्रभर त्या काटेरी झुडपात निपचित पडली होती. दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली असता तिने आरडाओरड केली तसेच आजीला आवाज द्यायला लागली.
लेकराचा विव्हळणारा आवाज लगतच असलेल्या शेतकऱ्याने ऐकला. तिला तात्काळ त्या काट्यातून काढत उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारानंतर घटनेचे बिंग फुटले आणि नराधम मारोती भेंडाळे (32) पोलिसांनी गजाआड केले.
घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला, त्या विकृत नाराधमाला कठोर शासन व्हावे याकरिता अनेक संघटना सरसावल्या. तर न्यायिक प्रकरण “फास्ट ट्रॅक” मध्ये चालविण्याची मागणी उंबरकर यांनी केली.
रविवारी राजू उंबरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पहापळ गाव गाठले. पीडित परिवारांचे सांत्वन केले तर चिमुकलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याचे आश्वस्त करत तात्काळ 10 हजार रुपये अर्थसहाय्य केले. याप्रसंगी संतोष रोगे, आकाश खामनकर, शुभम पिंपळकर यांचेसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार