Home Breaking News सदैव सोबत राहणारी ‘सावली’ क्षणभर होणार लुप्त..!

सदैव सोबत राहणारी ‘सावली’ क्षणभर होणार लुप्त..!

486

शुक्रवारी वणीकर अनुभवतील शून्य सावली दिवस

वणी: आपली सावली आपल्या सोबत वर्षभर असते ती कधीच आपल्याला सोडून जात नाही असे बोलल्या जाते. मात्र सदैव सोबत राहणारी ‘सावली’ क्षणभर लुप्त होणार असून शून्य सावली दिवसाचा आनंद शुक्रवारी वणीकर नागरिकांना अनुभवता येणार आहे.

स्काय वॉच ग्रुप,चंद्रपुरचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी विदर्भातील शून्य सावली दिवसाचे आकलन केले आहे. कोणत्या दिवशी किती वाजता वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाणार याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून निरीक्षण नोंदवले आहे. तर विदर्भातील सर्व शहर, ग्रामीण भागात निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन स्काय वाच गृपच्या वतीने करण्यात आले आहे.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 ° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दर रोज 0.50 ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर 2 दिवस राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात 3 मे ते 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे रोजी तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून 23.50 ° अंशावरून कर्कवृत गेले आहे, त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. भारतात 23.50 अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शुक्रवार दि. 20 मे ला मुकुटबन, पांढरकवडा, झरी, वणी, दिग्रस, लोणार येथे शून्य सावली अनुभवता येणार आहे. तर 22 मे ला यवतमाळ येथे शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येणार आहे. दुपारी 12.00 ते 12.35 या वेळे दरम्यान कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात करावे. याकरिता दोन, तीन इंच व्यासाचा, एक, दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू, मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.
वणी: बातमीदार