Home Breaking News गिट्टीक्रशर मध्ये तरुण अडकला, घटनास्थळीच मृत्यू

गिट्टीक्रशर मध्ये तरुण अडकला, घटनास्थळीच मृत्यू

1562

मोहदा मधील दुर्दैवी घटना

वणी: गिट्टीक्रशर चे माहेरघर असलेल्या मोहदा या गावी क्रॅशर मशीन मध्ये अडकुन 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. 17 मे ला मध्यरात्री घडली असून सुरक्षेचा अभाव असलेले क्रॅशर प्लांट सर्वस्वी जबाबदार आहेत.

बिसनलाल चरणजीत यादव (19) असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. तो मध्यप्रदेशातील अनुपुर या गावचा रहिवाशी होता. हेल्पर म्हणून कार्यरत असलेला तो तरुण नेहमीप्रमाणे रात्री काम करत असताना प्लांटमधील हॉपरमध्ये अडकलेला दगड काढायला गेला आणि याच वेळी तो मशीनमध्ये ओढलागेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

श्री साई मिनरल्स क्रॅशर प्लांट मध्ये घडलेली घटना अनागोंदी व बेजबाबदारपणाचा जिवंत पुरावा आहे. येथील क्रशर प्लांटवर परप्रांतीय कामगारांचा भरणा मोठया प्रमाणात असून सुरक्षेची कोणतीही उपाययोजना प्लांटधारक करताना दिसत नाही. चंद्रपूर निवासी सुनील बियाणी यांच्या मालकीच्या प्लांटमध्ये सदर घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.

गिट्टीक्रशर प्लांट मध्ये मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती तब्बल सात तासानंतर प्लांट व्यवस्थापकाने बुधवारी सकाळी शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मशीनमध्ये अडकलेल्या त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड करत आहे.
वणी: बातमीदार