● वंचित आघाडीचा पुढाकार
● SDO यांनी दिले अतिक्रमण काढण्याचे आदेश
वणी: घरी जाण्या- येण्याच्या रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने प्रचंड त्रस्त झालेले निळापूर येथील वृद्ध दाम्पत्य चक्क उपोषणाला बसले होते. त्या वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत SDO यांना अवगत केले असता एक महिन्याच्या आत ते अतिक्रमण काढावे असा लेखी आदेश BDO यांना दिला.आदेशाची प्रत प्राप्त होताच वृद्ध दाम्पत्याने उपोषणाची सांगता केली.
निळापूर येथील वयोवृद्ध दाम्पत्य शेवताबाई काटकर व धर्मदेव काटकर यांचे घरी जाण्याचा रस्त्यावर गावातील मनोहर ठाकरे यांनी अतिक्रमण केले होते. यामुळे त्यांना घरी जाताना व बाहेर पडताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या प्रकरणी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या मात्र कोणीच दखल घेत नसल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उगारले.
वृद्ध दाम्पत्याने बुधवार दि. 18 मे पासून अतिक्रमण काढण्याच्या मागणीला घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली होती. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने रस्ता मोकळा केला मात्र यावर उपोषणकर्ते समाधानी नव्हते. रस्त्यावरील संपूर्ण अतिक्रमण काढण्याची मागणी करत त्यांनी उपोषण सुरूच ठेवले.
उपोषणकर्त्यांच्या प्रकृती खालावत असल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतल्या आणि उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना निवेदन देऊन उपोषणकर्त्यांच्या आंदोलनाची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली. SDO यांनी तात्काळ BDO यांना कारवाईचे आदेश दिले.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढून त्यांना उपोषण सोडविण्यासाठी परावृत्त केले व तहसीलदार निखिल धुरधळ, मंगल तेलंग, मिलिंद पाटील, ऍड. विप्लॉव तेलतुंबडे यांचे उपस्थितीत उपोषणकर्त्यांना नारळ पाणी पाजून उपोषणाची सांगता केली.
यावेळी शहराध्यक्ष किशोर मुन, महासचिव डॉ.आनंद वेले, प्रमोद लोणारे, गौतम जीवणे, कीर्ती लभाने, ऍड सतीश चांदेकर, ऍड हसन शरीफ, संदीप दुपारे, कपिल मेश्राम, शंकर नगराळे, राहुल काटकर, रितेश ठाकरे, भारत तामगाडगे, सविता काटकर, सुस्मा कळसकर , प्रेमीला कळसकर, रेखा कांबडे, निरु नगराळे, नटवर नगराळे यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार