● रवी नगरातील नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास
वणी: रवी नगर परिसरात एका माकडाने चांगलाच हैदोस घातला होता. बुधवारी त्याने तब्बल 6 ते 7 जणांना चावा घेतला होता यात लहान बालकांचा समावेश होता. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे धास्तावले होते. गुरुवार दि. 26 मे ला वन विभागाने वर्धा येथील पथकाच्या साह्याने त्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश आले असून स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
रवी नगर परिसरात कळपातून वेगळा झालेल्या माकडाने डीपी रोड वरील पुंडलिक लखमापुरे यांच्या घरातील कुलर खाली आपले बस्तान बसवले होते. मात्र त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केल्यास तो चावा घेत असल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच त्या माकडाने 6 ते 7 जणांना चावा घेतल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.
परिसरातील लहान मुलांना तसेच नागरिकांना ‘तो’ चावा घेत असल्याने वन विभागाकडे तक्रार करण्यात आली हाती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला. दुसऱ्या दिवशी ते चवताळलेले माकड पकडण्यासाठी वर्धा येथील वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले असता डॉट मारून माकडाला बेशुद्ध करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्या माकडाला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी गणेश महानगडे यांनी सांगितले.
वणी: बातमीदार