● महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक
वणी: खरेदी विक्री संघात शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचे वास्तव समोर येताच मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सैनिकांनी प्रशासनाला धारेवर धरत अल्टीमेटम दिला. तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरले तर ‘खळखट्याक’ करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्यस्थीतीत अॅक्शन मोड मध्ये आहे. सर्व सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक होताना दिसत आहे. मारेगाव तालुक्यात समाजमन सुन्न करणारी घटना घडली होती. चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले होते. तर खरेदी विक्री संघात शेतकऱ्यांची फरफट होत असल्याचे समजताच मनसे आक्रमक झाली आहे.
वणी उपविभागात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणल्या जातो. तसेच रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडने हमीभाव केंद्र सुरू केली आहे. परंतु सर्वकाही सुरळीत सुरू असताना मात्र नाफेडच्या वरिष्ठ कार्यालयाकडून खरेदी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
खरेदी बंद करण्याच्या किमान आठ दिवस आधी पूर्वसूचना देणे अपेक्षित असताना आदल्याच दिवशी खरेदी बंद करून दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना हा निर्णय झाल्याचे कळले. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालून बाजार समिती प्रशासनाशी वाद उपस्थित केला, मात्र बाजार समिती प्रशासनाने याबाबत आपली असमर्थता व्यक्त करीत हा नाफेडचा निर्णय असल्याचे सांगितले.
अखेर खरेदी अचानक बंद केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्याशी संपर्क केला. गोहोकार हे आपल्या कार्यकर्त्यांसह खरेदी विक्री कार्यालयात पोहोचले. यावेळी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले व शेतकऱ्यांचा माल साठवून घेण्यात यावा अन्यथा ‘खळखट्याक’ करू अशी तंबी प्रशासनाला दिली.
अखेर प्रशासनाने शेतकऱ्याचा माल साठवून घेण्यास सहमती दर्शवली व शेतकऱ्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामामध्ये साठवण्यात आला त्यानंतर ऑनलाईन प्रक्रीया पूर्वरत चालू होईल त्या वेळी शेतकऱ्यांना माल खरेदी केल्या जाईल अशी ग्वाही प्रशासनाने दिली. यावेळी प्रकाश ठाकरे, दीपक निखाडे, संदीप कुरेकार, गोपाल दासारे, ज्ञानेश्वर वाघाडे, रमेश बोथले, नामदेव ठावरी, केशव उलमाले, प्रमोद निमकर इत्यादी शेतकरी व राजू बोदाडकर, अरविंद राजूरकर, विनोद कुचनकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते
वणी: बातमीदार