Home Breaking News अखेर….. शिरपूर चा ‘सुमित’ IPS झालाच

अखेर….. शिरपूर चा ‘सुमित’ IPS झालाच

4467

तिसऱ्या प्रयत्नात कौतुकास्पद कामगिरी

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे फळ मिळाले

वणी: लोकसेवा आयोगाच्या आज लागलेल्या निकालात 358 वी रँक मिळवणारा शिरपूर चा ‘सुमित’ अखेर IPS झालाच. तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले असून ग्रामीण भागातील मुले देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात हे त्याने दाखवून दिले आहे.

तालुक्यातील शिरपूर सारख्या लहानश्या गावातील तरुण जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावण्याचे स्वप्न बघतो. घरची परिस्थिती हालाखीची असताना यशोशिखरावर पोहचण्यासाठी धडपडतो आणि तिसऱ्या प्रयत्नात कौतुकास्पद कामगिरी करतो. हे सर्व स्वप्नवत असले तरी घरच्यांचे प्रोत्साहन, स्वतःची इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमच खऱ्या अर्थाने कारणीभूत आहे.

शिरपूर येथील सुमित सुधाकर रामटेके याने यापूर्वी दोन वेळा लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा दिलेली आहे. दुसऱ्यांदा दिलेल्या परीक्षेत त्याने अनुसूचित जाती या प्रवर्गातून 748 रँक प्राप्त केली होती. दिल्लीत डायरेक्टर इन इंडियन कॉर्पोरेट लॉ येथे तो रुजू झाला होता. मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बघत असल्याने त्याने पुन्हा जोमाने तयारी केली आणि यश प्राप्त केले आहे.

सुमितचे वडील शिरपूर येथील गुरुदेव विद्यालात परिचारक म्हणून कामाला होते. बालपणापासून हुशार असलेल्या ‘सुमित’ ने शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण केले. त्याने पुढील शिक्षणाकरिता वणी गाठली व जनता विद्यालात प्रवेश घेतला. बारावी नंतर त्याने IITवाराणसी येथून बीटेक. ची पदवी प्राप्त केली. चांगल्या वेतनाची नोकरी सुद्धा मिळाली मात्र स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने त्याने पुन्हा
UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश प्राप्त केले आहे.

‘सुमित’ ला लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 358 वी रँक मिळाली आहे. त्याला IPS करिता महाराष्ट्र कॅडर मिळाले आहे. त्याच्या यशात आई ज्योत्स्ना व वडील सुधाकर रामटेके यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यातच त्याने घेतलेले अपार कष्ट, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे फळ असून ग्रामीण भागातील तरुणांसाठी ‘सुमित’ ‘आयकॉन’ ठरला आहे.
वणी: बातमीदार