● संतप्त ग्रामस्थांनी SDO यांना दिले निवेदन
वणी: वणी – नांदेपेरा हा राज्य मार्ग कोळसा व रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे ‘मृत्यूकुंड’ होत चाललाय. अस्ताव्यस्त वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत असल्याने नांदेपेरा येथील ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहे. सातत्याने होत असलेली कोळसा व रेतीची ओव्हरलोड वाहतूक तात्काळ थांबवावी अशी मागणी उप विभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
वणी- नांदेपेरा राज्य मार्गावरून भरधाव वाहतूक होत आहे. त्यातच अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दि. 25 मे ला रात्री 10 वाजताच्या सुमारास वणी वरून पोहणा या गावी परतणाऱ्या दत्तात्रय दरवे यांच्या दुचाकीला नांदेपेरा जवळ कोळसा भरलेल्या भरधाव ट्रक ने कट मारला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. असे लहानसहान अपघात नित्याचेच झाले आहे.
नांदेपेरा येथील ग्रामस्थांनी उप विभागीय अधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले आहे. यात तीन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून सतत होणारी कोळशाची ओव्हरलोड वाहतूक बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर सुरेश शेंडे, राजू खामनकर, चांद्रज्योति शेंडे, नीलकंठ डोंगे, शंकर किटे, राहुल डोंगे, वसंत खामनकर, प्रकाश देठे, मंगेश काळे, पंकज ठावरी यांचेसह अनेक ग्रामस्थांनी स्वाक्षरी केली आहे.
वणी: बातमीदार