Home Breaking News दणका…उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ‘अपात्र’

दणका…उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ‘अपात्र’

1169

अतिक्रमण करणे भोवले

वणी: तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतीत सत्ताधारी व विरोधकात ‘तक्रारयुद्ध’ रंगले आहे. त्याचे पडसाद आता शासकीय आदेशातून उमटताना दिसत आहे. शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या तक्रारीमुळे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.

माजी सरपंच गौतम अमरसिंग सुराणा यांनी उपसरपंच सचिन ज्ञानेश्वर रासेकर यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. यात उपसरपंच यांची आई रंजना ज्ञानेश्वर रासेकर यांनी शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं स्पष्ट करत ते संयुक्त कुटुंबात राहत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

मोहदा येथील ग्रामस्थ हरिदास गणपत केळझरकर यांनी ग्रामपंचायत सदस्य गजानन विलास शेलवडे यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे सन 2021 मध्ये तक्रार केली होती. यात शेलवडे यांनी जि.प.उ.प्रा. शाळा मोहदा यांच्या शासकीय जागेवर पानठेला उभारून अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

याप्रकरणी दोन्ही बाजूने केलेला लेखी युक्तिवाद, सचिव ग्रा.प. मोहदा व मुख्याध्यापक जि. प. उच्च प्रा. शाळा मोहदा यांनी दिलेले अहवाल व इतर दस्तावेज यांचे अवलोकन केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी प्र.कि.दुबे यांनी 8 जून 2022 रोजी आदेश पारित केले. आदेशात मोहदा ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन रासेकर व ग्रा प. सदस्य गजानन शेलवडे या दोघांना पुढील आदेशा पर्यंत अपात्र घोषित केले आहे.
वणी: बातमीदार