● शिवसेना उपजिल्हा प्रमुख निखाडे आक्रमक
● प्रशासनाला दिला दहा दिवसाचा अल्टीमेटम
वणी: चंद्रपूर आगाराची यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन येथे ये-जा करणाऱ्या बसफेऱ्याचा मार्ग नकोडा ग्रामपंचायतीने चक्क रस्त्यावर बॅरीकेट्स टाकून बंद केला आहे. यामुळे शिंदोला परिसरातील 20 ते 25 गावातील प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा मार्गावर लावण्यात आलेले बॅरीकेट्स तात्काळ काढावे असे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना देत कारवाईची मागणी केली आहे.
नकोडा ग्रामपंचायतीने बसचा पूर्ववत मार्ग बंद केल्यामुळे मुंगोली, माथोली, साखरा, परमडोह, चिखली, टाकळी, शेवाळा, चनाखा, कोलगाव, शिवणी, येनक, येनाडी, पाथरी, कुर्ली, शिंदोला व परिसरातील शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्गात शिकणारे विध्यार्थी- विद्यार्थिनींची तसेच महिला, गर्भवती, विविध आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचारार्थ चंद्रपूरला जावे लागते अशा प्रवाश्यांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.
कोरोनाचा कालखंड तसेच राज्यमार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप यामुळे बस चे अवागमन विस्कळीत झाले होते. या कालावधी दरम्यान वेकोलीच्या कोळसा खाणीतील कोळशाची अवजड वाहनातून होणाऱ्या वाहतुकीमुळे नकोडा ग्रामपंचायतीने चक्क रस्त्यावर बॅरीकेट्स टाकून हा मार्गच बंद करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत तरी 25 जून पूर्वी चंद्रपूर- मुकूटबन बसचा पूर्ववत मार्ग सुरू करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा स्थानिक नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी परिसरातील विध्यार्थी, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व नागरिकांसह 26 जूनला मुंगोली पुलावर चक्काजाम करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
वणी: बातमीदार