● औचित्य राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे
वणी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनर्माण महिला सेनेच्या वतीने बारावीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बुधवार दि.15 जूनला आयोजित करण्यात आला होता.
महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर यांच्या वतीने ह्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक वेळी अपेक्षेएवढे गुण मिळतातच असे नाही. कमी गुण मिळूनही करिअरच्या विविध वाटा कोणत्या, एखादे क्षेत्र निवडताना त्याबद्दलची माहिती कशी मिळवावी तसेच बदललेल्या परिस्थितीचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करावे याबाबत आपले मत व्यक्त केले.
आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तृप्ती उंबरकर उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात, कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अल्का टेकाम यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात पुढील प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या, प्रत्येक क्षेत्रात संधी आहे ती शोधता आली पाहिजे. त्यातून योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे, वडिलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. असे त्यांनी विध्यार्थ्यांना समजावून सांगितले.
आयोजित सत्कार समारंभाला माजी नगराध्यक्ष प्रिया लभाने, मनसे महिला शहराध्यक्षा विद्या हिवरकर, सिंधु बेसेकर, प्रभा ढेंगळे, वैषाली तायडे, प्रतिभा निमकर सह महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचलन आणि आभार प्रदर्शन माजी गट निदेशक गोविंद थेरे यांनी केले.
वणी: बातमीदार