● केंद्रप्रमुखाकडे होता गटशिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार
वणी: तालुक्यात दोनशेच्या वर प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. परंतु मागील अनेक वर्षापासून येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा गाडा प्रभारावरच ओढला जात होता. कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तालुक्याला गट शिक्षणाधिकारी प्राप्त झाले आहेत.
सरळ सेवेत आलेल्या स्नेहल काटकर या तरुण अधिकाऱ्याने गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी स्विकारली आहे. येथील शिक्षण विभाग पुर्णतः रिक्त झाला होता. एकाकी केंद्रप्रमुखाकडे गटशिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार सोपविण्याची नामुष्की शासनावर आली होती.
शिक्षण विभागात सनियंत्रण करणारा अधिकारी वर्गच नसल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला होता. आता गटशिक्षणाधिकारी यांचेसह दोन विस्तार अधिकारी सुद्धा येथे रुजु झाले आहेत. तरीही दोन विस्तार अधिकारी व डझनभर केंद्रप्रमुखांची पदे अजुनही रिक्त आहेत.
जेष्ठ शिक्षकांकडे केंद्रप्रमुखांची जबाबदारी देऊन काम निभावले जात आहे. त्यांना गटसंसाधन केंद्रातील साधन व्यक्ती, विषयतज्ञ, गटसमन्वयक व इतर कर्मचारी सहकार्य करीत असल्याने शिक्षण विभागातील आदान-प्रदान प्रक्रिया तरी सुरळीत सुरु आहे.
पुढील आठवडयात शाळा सुरु होणार असल्याने त्याच्या पुर्वतयारी व नियोजन करण्यासाठी नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी यांनी सोमवारी सर्व मुख्याध्यापकांची सभाही घेतली आहे. आता उर्वरित रिक्त पदे कधी भरली जातील याकडे लक्ष लागले आहे. शासनातर्फे दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहचली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी ती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार
https://rokhthok.com/2022/06/21/16547/