Home Breaking News आणि..तरुणाने केला पोलिसांवरच ‘हल्ला’

आणि..तरुणाने केला पोलिसांवरच ‘हल्ला’

574

गोकुळनगर परिसरातील घटना

वणी: अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या 112 या क्रमांकावर वारंवार कॉल करून पोलिसांची मदत मागणाऱ्या तरुणाने पोलिसावरच हल्ला केला. ही घटना मंगळवार दि.21 जूनला रात्री 11.25 वाजता घडली असून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गज्जू भगाडे (35) असे आरोपीचे नाव असून तो गोकुलनगर परिसरात वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी रात्री त्याचा घरगूती वाद सुरू होता. यावेळी तो गुलाबी नशेत असल्याने वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्याने मारहाण होत असल्याचे कारण पुढे करत अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या 112 क्रमांकावर कॉल केला.

पोलीस गोकुलनगरात पोहचले असता युवक पोलिसांना घरी आढळून आला नाही. पोलिसांनी कुटुंबियांकडून प्रकरणाबाबत चौकशी केली, आणि परतले. त्या तरुणाने पुन्हा कॉल करून पोलिसांना मदत मागितली. पोलीस आपल्या वाहनातून पुन्हा तेथे गेले असता मदहोशीत असलेल्या युवकाने चक्क पोलिसांवर हल्ला चढविला.

या घटनेत वाहनाच्या काचा फोडन्यात आल्या असून. पोलिस वाहनाचे नुकसान झाले आहे. तसेच मदतीला गेलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला चढविणात आला. यावेळी पोलीस कर्मचारी निरंजन खिरटकर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भादंवि च्या कलम 332, 353, 182, 427, 504, नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
वणी: बातमीदार