Home Breaking News उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक ‘एकवटणार’

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक ‘एकवटणार’

847

शिवतीर्थावर शुक्रवारी शक्तीप्रदर्शन

वणी : शिवसेनेच्या मंत्र्यासह आमदारांनी महाविकास विरोधात बंड पुकारला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदारांनी केलेल्या या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाकी पडल्याचे दिसत असतांनाच येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शुक्रवार दि 24 जूनला जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करणार आहे.

मागील चार दिवसांपासून राज्यातील राजकारणात भुकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यांना शिवसेनेने मोठे केले तेच आज स्वार्थासाठी पक्षाच्या विरोधात दंड थोपटत आहे. यामुळे शिवसेना पक्षातच दुफळी निर्माण होऊन पक्षाला धोका निर्माण झाल्याची भावना सामान्य शिवसैनिक व्यक्त करीत आहे.

आघाडी सरकार मध्ये घुसमट होत असल्याचे कारण पुढे करत बंडखोर आमदार, मंत्री व नेते स्वस्वार्थाचे राजकारण करत असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे वणी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांची बैठक गुरुवारी जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात पार पडली.

या कठीण प्रसंगी वणी, मारेगाव व झरी येथील शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते. शिवसैनिक शिवसेनेचे सच्चे पाईक असल्याने सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सर्वांनी मान्य केले आहे.

बंडखोरांनी केलेले कृत्य शिवसेनेसाठी अशोभनीय आहे. सत्तेची लालसा आणि केंद्रीय यंत्रणांचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी पक्ष व पक्षप्रमुखाला वेठीस धरणे योग्य नाही. हिंदुत्वाचे बेगडी राजकारण करून पक्षविरोधी कारवाई शिवसैनिकाला मान्य नाही.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केंदीय यंत्रणेला समर्थपणे सामोरे जात असताना शिवसेनेतील लालची बंडखोरांच्या कृती विरोधात तसेच पक्ष प्रमुखांच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करण्याकरिता शुक्रवारी दुपारी 12 वाजता येथील शिवाजी चौकात शिवतीर्थावर वणी विधानसभा क्षेत्रातील कट्टर शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी केले आहे.
वणी: बातमीदार