Home Breaking News विद्यार्थी नव्वद आणि शिक्षक एक

विद्यार्थी नव्वद आणि शिक्षक एक

457
C1 20241123 15111901

मनसे आक्रमक, शिक्षक द्या अन्यथा…

वणी: तालुक्यातील शिक्षण विभाग कमालीचा अशिक्षित असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. पहिली ते सातवी पर्यंत वर्ग, तब्बल 92 विद्यार्थी आणि एकच शिक्षक अशी अवस्था कळमना (बु) येथील जिल्हा परिषद शाळेची आहे. वारंवार शिक्षकाची मागणी करून सुद्धा शिक्षण विभाग टाळाटाळ करत असल्याने मनसे आक्रमक झाली आहे.

तब्बल पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तालुक्याला गटशिक्षण अधिकारी लाभले आहे. त्यांच्या समोर शिक्षण प्रणालीचा दर्जा सुधारण्याचे आव्हान असताना शिक्षकांची वानवा, पटसंखे नुसार शिक्षकांची नियुक्ती करण्याचे कठोर धोरण अवलंबवावे लागणार आहे.

मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देत वरिष्ठ प्राथमिक शाळा कळमना (बु) येथील सत्यता कथन केली. वरिष्ठ प्राथमिक शाळेत वर्ग पहिली ते सातवी आहे तेथील विद्यार्थ्यांची पटसंख्या 92 असून शाळेत फक्त एक शिक्षक गेल्या चार वर्षापासून शिकवत आहे. एक शिक्षक पहिली ते सातवी पर्यंत कसा काय शिक्षण देऊ शकेल अशी शंका निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाच्या अनागोंदी धोरणाचा विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून कळमना (बु) या गावातील शाळेत पटसंख्यानुसार व वर्गानुसार शिक्षक नेमावेअशी मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास आठ दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
वणी: बातमीदार